प्रभात वृत्तसेवा सातारा – पैसा म्हणजे संपत्ती नसून, जगात आता ज्ञान हीच संपत्ती झाली आहे. जग खूप वेगाने पुढे चालले आहे. ज्ञान अद्ययावत असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले, कारण ज्ञान बहुउद्देशीय असले पाहिजे. माणूस सर्वांगीण विकसित झाला पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजितसिंह पाटणकर, अमित कुलकर्णी अमरसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, हिंदुराव पाटील, राजाभाऊ शेलार आदी उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, माणसाने ज्ञानाची स्पर्धा करावी. स्टार्टअप इंडियामुळे आपण जगभरात पोहचलो आहोत. भारतात बुद्धिमत्ता असून, फक्त आधाराची गरज आहे. जगाभरातील अनेक कार्पोरेट कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. आमदार डॉ. भोसले म्हणाले, आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात वसतिगृहांना मोठ्या प्रमाणात मदत दिली जात आहे. संजीव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीपक डांगे यांनी सूत्रसंचालन केले. एस. डी. पवार यांनी आभार मानले.