Satara News : ऑगस्टच्या अखेरीस फुलणार कास पठार; रंगीबेरंगी फुलांची होणार उधळण
जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पठारावर (Satara News) यंदाच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विविधरंगी रानफुलांची आकर्षक उधळण पाहायला मिळणार आहे.

Satara News : जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पठारावर (Satara News) यंदाच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विविधरंगी रानफुलांची आकर्षक उधळण पाहायला मिळणार असून, पर्यटकांसाठीही अनेक नव्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती कास पठार व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी दिली.
यंदा कास पठारावर (Satara News) विविध प्रकारची दुर्मीळ रानफुले पूर्ण बहरात येण्याची अपेक्षा असून, संपूर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी नटणार आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील पर्यटकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा हा कास दर्शनासाठी सर्वोत्तम ठरणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
यावर्षी पर्यटकांना राजमार्ग ते कुमुदिनी तलाव या सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरात फुलांचा मनमोहक नजारा अनुभवता येणार आहे. विशेषतः कुमुदिनी परिसरातील पांढरी कमळे आणि इतर जलवनस्पती पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.
पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी कास पठार व्यवस्थापन समिती व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीसह ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनाही कास दर्शन अधिक सोयीचे होणार आहे.
याशिवाय, यंदा मंडपगड पॉईंट पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असून, त्या ठिकाणी जाण्यासाठी नवीन पायवाट विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना कास परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य अधिक जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
कास पठारावरील (Satara News) पर्यटक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने विविध विकासकामे अंतिम टप्प्यात असून, यंदाचा फुलांचा हंगाम अधिक आकर्षक आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी व्यक्त केला.






