Satara News : शासनाला ऑनलाईनची घाई नडली, प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडली

सातारा : मुलांना संपूर्ण शैक्षणिक सत्रात अभ्यास करता यावं या उद्देशाने पेपर तपासणीचा शिक्षकांवर काय ताण येईल याचा विचार न करताच शासनाने दहावी आणि बरावीचा निकाल मे महिन्यात लावण्याची घाई केली. मे मध्ये निकाल लागूनही जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरीही अकरावी आणि प्रथम वर्षाचे वर्ग अद्यापही सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासाशी संवाद तुटू लागला आहे.
राज्य शासानने 5 मे रोजी बारावीचा निकाल लावला पण अजूनही बारावीच्या प्रवेश फेरी सुरू झाल्या नाहीत. दहावीचा निकाल तेरा मे रोजी लागला पण अजूनही प्रवेश निश्चित झाले नाहीत. कधी याद्या जाहीर होणार आणि कधी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार? असा सवाल आता पालक आणि विद्यार्थ्यांना सतावत आहे. परीक्षा लवकर घेऊन आणि निकाल लवकर जाहीर करून शासनाने नेमके काय साध्य केले असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
1. ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ
मुलांच्या परीक्षांच्या तारखा अचानक बदलल्या गेल्या. पालक, शिक्षण संस्था, शिक्षकांनी विरोध केला, पण कोणालाही न जुमानता परीक्षा नेहमीच्या वेळापत्रकाच्या दहा दिवस आधीच घेतल्या गेल्या. त्यामागे वेगवेगळी कारणं सांगितली गेली. परीक्षा लवकर घेतल्या म्हणजे निकाल लवकर लागतील, प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होतील आणि नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होईल. प्रत्यक्षात मात्र भलताच गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे.
2. ऑगस्टमध्ये सुरू होणार वर्ग
मे महिन्यात निकाल लागल्यानंतर यंदा महाविद्यालये शाळांप्रमाणेच जूनच्या दुसर्या आठवड्यात सुरू होणार असा कयास बांधला जात होता. शासनाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने महाविद्यालयातील वर्ग सुरू होती अशी अनेकांना खात्री होती. पण ऑनलाईन प्रक्रिया न समजल्याने वर्ग ऑगस्टमध्येच सुरू होणार अशी खात्री होउ लागली आहे.
शाळा महाविद्यालयांवरील ताण कमी करण्यासाठी शासनाने यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. पण शासनाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण कर्मचार्यांना न मिळाल्याने गोंधळ वाढला आहे. याचा त्रास व्यवस्थापनाबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांनाही होत आहे.
– राजेंद्र चोरगे, संस्था चालक





