Satara News: कोयनेतील लाँचेसच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी निधी

Satara News: कोयना जलाशयाच्या पाणीसाठ्यामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या दळणवळण व संपर्कासाठी शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्या तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील जलवाहतुकीसाठी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी, तसेच बार्च, लॉन्चेसच्या इंधन व देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी आॅक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी ३५ लाख ५३ हजार ३१० रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी मदत व पुनवर्सनमंत्री मकरंद पाटील यांनी प्रयत्न केले होते. या निर्णयामुळे कोयना जलाशयाच्या परिसरातील लोकांना समाधान व्यक्त केले.
कोयना जलाशयाच्या पाणीसाठ्यामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या दळणवळण व संपर्कासाठी १९७६-७७ पासून तापोळा (ता. महाबळेश्वर) परिसरात जलवाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. हा तराफा केळघर तर्फ सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोट्या- मोठ्या वाहनांची पाण्यातून वाहतूक करत असतो. त्यामुळे कोयना जलाशयावरील साताऱ्यातील दुर्गम व डोंगराळ भागात दळणवळणाचा कणा म्हणून तराफा वाहतूक समजली जाते. हा भाग दुर्गम असून, पर्यटक आपली वाहने ताराफ्यातून घेऊन जात असतात. स्थानिक साताऱ्याला जा- ये करण्यासाठी आपली वाहने घेऊन जातात.
तापोळा येथील जलवाहतुकीसाठी सध्या कार्यरत असलेल्या १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी घेणे व त्यांच्या वेतन व भत्त्यासाठी मदत व पुनर्वसन विभागामार्फत अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून सहायक अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ व ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील देय वेतन, भत्ते व मानधन अदा करण्यासाठी, तसेच इंधन व देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी ३५ लाख ५३ हजार ३१० रुपयांचा निधी पुणे विभागीय आयुक्तांकडे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या निर्णयामुळे कोयनेच्या खोऱ्यातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.





