Satara News : पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करा! शिवसेना महिला आघाडीची मागणी; साताऱ्यात मूकमोर्चा
Satara News : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेल्या राड्याविरोधात शिवसेनेचा मूक मोर्चा; पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी.

Satara News – सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला वैचारिक परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान जे दबाव नाट्य, अटक सत्र आणि राज्याच्या मंत्री महोदयांना धक्काबुक्कीचे प्रकार झाला तो निंदनीय आहे. यात सत्ता स्थापन करण्यास मदत करणाऱ्या पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थ पोवई नाका असा मूक मोर्चा काढला.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर करून बहुमतासाठी आवश्यक ते 37 संख्या बळ जुळवले होते असे असताना विरोधकांनी बळाचा वापर करून प्रचंड दांडगाई केली. त्यादिवशी पोलिसांची भूमिका ही सत्ताधाऱ्यांना धार्जिणी किंबहुना घरगड्यासारखी होती. यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. खा. नितीन पाटील व ना. मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला असून जिल्ह्याच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला गेला आहे.
जि. प. मधील गोंधळ नाट्याची न्यायालयीन चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. सीसीटीव्ही फुटेज सर्वांसाठी खुले करून नक्की त्या दिवशी काय घडले हे जनतेसमोर आणावे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड रद्द करून नव्याने फेर निवड घेण्यात यावी. संबंधित प्रकरणातील शासकीय स्तरावरील दोषी अधिकाऱ्यांच्या तत्काळ बडतर्फ करून त्यांच्या जागेवर कर्तव्यनिष्ठ अधिकारी नेमावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य कविता ओंबळे, उप जिल्हाध्यक्ष सुलोचना पवार, वाई विधानसभा सन्मयक वर्षा अरडे, कराड उत्तर विधानसभा उप जिल्हा प्रमुख विमल सुपणेकर, कराड दक्षिण तालुकाप्रमुख संध्याताई दाभाडे, तालुकाप्रमुख कराड उत्तर प्रियांका वाघमारे, माण, खटाव, तालुका प्रमुख प्रियांका नलावडे, महाबळेश्वर तालुका प्रमुख मेघा चोरगे,कराड शहरप्रमुख मोनिका पवार, मलकापूर शहरप्रमुख विद्या घाडगे, फलटण तालुका प्रमुख नंदिनी गायकवाड,
महाबळेश्वर शहर प्रमुख सुनीता फाळके, वाई तालुका प्रमुख सुजाता गायकवाड,महाबळेश्वर शहरप्रमुख अर्चना जाधव, पाटण शहरप्रमुख विद्याताई वायदंडे, सातारा शहरप्रमुख मंजिरी सावंत, समन्वयक मिनाक्षी मोरे, कांचन गौरी शिंदे, सविता राठोड, रोजीया शेख, सुजाता राठोड, शांताबाई ओंबळे, नीता ओंबळे, हौसाबाई सुतार, उषा उंबरकर, पार्वती ओंबळे, आनंदी जुनघरे, वैष्णवी धनवडे, वनिता ओंबळे आणि शिवसैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.



