Satara News | निसर्गाच्या बाजूने निर्णय ; कोल्हापूरमधील खाण प्रस्ताव फेटाळला

प्रभात वृत्तसेवा
कराड – कोल्हापूर येथील हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या बॉक्साइट खाणीला पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने परवानगी नाकारली आहे. ही खाण पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात येत असल्याचे वन सल्लागार समितीने स्पष्ट केले आहे. या खाणीला परवानगी नाकारल्याने, पर्यावरणतज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे. खाणकाम रोखल्याने, वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित राहण्याबरोबर पश्चिम घाटाची जैवसंपन्नता अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या बॉक्साइट खाण प्रकल्पाला 2009 मध्ये तत्त्वतः मान्यता आणि जानेवारी 2014 मध्ये केंद्राकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र, कंपनीला वन संसाधनांचे अधिकार प्रमाणपत्र मिळाले नसल्याने, 16 हेक्टर वन वळवण्यासाठी अंतिम मंजुरीची आवश्यकता होती. याबाबत वन सल्लागार समितीने 30 जुलैच्या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद केले की, कंपनीच्या अंतिम मंजुरीच्या प्रस्तावावर नागपूर येथील वने उपमहासंचालक आणि राज्य शासनाच्या नोडल अधिकार्यांशी सविस्तर चर्चा केली.
त्यावेळी खाण भाडेपट्टा वैधता, पश्चिम घाटाच्या पर्यावरण संवेदनशील भागात प्रस्तावित खाणकामावर बंदी आणि संवर्धित राखीव क्षेत्रात खाण भाडेपट्ट्याचे स्थान या मुद्द्यांचा उल्लेख वन सल्लागार समितीने केला. हा प्रस्ताव सध्या विचारात घेता येत नाही.दरम्यान, पश्चिम घाट संरक्षणाबाबत पर्यावरण मंत्रालयाच्या 2024 च्या मसुद्याच्या अधिसूचनेनुसार ‘ईएसएम’ध्ये खाणकाम, उत्खनन आणि वाळू उत्खननावर पूर्ण बंदी राहणार आहे. अंतिम अधिसूचनेच्या तारखेपासून किंवा खाण भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर, सर्व विद्यमान खाणी टप्प्याटप्प्याने रद्द कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्रातील 17 हजार 340 चौरस किलोमीटर क्षेत्र ‘ईएसए’ म्हणून विभागण्याचा प्रस्ताव केंद्राने मांडला आहे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 211 गावे ‘ईएसए’ म्हणून विभागण्याचा प्रस्ताव आहे.
“पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील पश्चिम घाटातील खाणकामाचा प्रस्ताव केंद्राने नाकारल्याचा आम्हाला आनंद आहे. या प्रदेशातील खाणकाम थांबवणे, हे मोठे आव्हान आहे. बॉक्साइट खाणींना विरोध करण्याची लढाई आम्ही गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ ती लढत आहोत.”
– देबी गोएंका, कार्यकारी विश्वस्त, कॉन्झर्व्हेशन अॅक्शन ट्रस्ट
“पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व तिलारी यांना जोडणारा भाग अत्यंत मोलाचा नैसर्गिक कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर व येथील जैवविविधता यांचे रक्षण होणार आहे. पर्यायाने येथील जलस्रोत शाबूत व सुरक्षित राहिली, तर जंगले व वन्यजीव वाचणार आहेत.”
– रोहन भाटे, मानद वन्यजीवरक्षक





