Satara news : खोडजाईवाडीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श

सातारा : खोडजाईवाडी (ता. कराड) गावाने पर्यावरणपूरकतेचा आदर्श घालून दिला आहे. गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत एकमताने प्रेरणादायी असा निर्णय घेतला आहे. दरवर्षी नवीन गणपती मूर्ती खरेदी करण्याऐवजी गावातीलच मूर्ती कुटुंबानुसार एकमेकांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र मांडवे व ग्रामपंचायत सदस्य सागर गोडसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याबाबत आवाहन केले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुन गावोगावी जनजागृती करण्याचे आवाहन केले
त्यानुसार कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटोल यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार खोडजाईवाडी गावाने आदर्शवत असा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
खोडजाईवाडी येथे राबवण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मूर्ती तयार करण्याचा खर्च वाचणार आहे. त्याचबरोबर विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषणही टाळले जाणार आहे. खोडजाईवाडी या गावाने हा अभिनव निर्णय घेतला आहे. यामुळे गावातील सामूहिकता, एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव वृद्धिंगत होणार आहे. श्रद्धा आणि परंपरा जपत आपण निसर्गाचे रक्षण आम्ही करणार आहोत.
गावाने घेतलेला हा निर्णय जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाबाबत खोडजाईवाडीचे उपसरपंच राजेंद्र मांडवे म्हणाले, गावकऱ्यांनी एकमुखाने घेतलेला हा निर्णय आपल्याला पर्यावरणपूरकतेच्या दिशेने नेणारा आहे.
गणपती उत्सव हा श्रद्धेचा उत्सव आहे; त्यात प्रदूषण नव्हे तर स्वच्छतेचा आणि पर्यावरण प्रेमाचा संदेश द्यावा, हेच आमचे ध्येय आहे. खोडजाईवाडीतील या निर्णयाचे सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रातून मोठे कौतुक होत आहे. हा उपक्रम इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे असे सुतोवाच ग्रामपंचायत अधिकारी सुधीर कदम यांनी केले.
गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाला कोठेही हानी पोहोचू नये. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हावासियांना आवाहन करण्यात आले आहे. खोडजाईवाडी गावाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा चांगला निर्णय घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. अन्य ग्रामपंचायतींनी याचे अनुकरण करावे,
याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी





