Satara News: गोंदवल्यात भाविकांची मांदियाळी! रविवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीचा मार्ग बदलणार; हे आहेत पर्यायी मार्ग

प्रभात वृत्तसेवा
सातारा – गोंदवले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या मुख्य दिवशी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन गोंदवल्यातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिले आहेत. येत्या रविवारी (ता. १४) मध्यरात्रीपासून रात्रीपर्यंत हा बदल करण्यात येणार आहे.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा ११२ वा पुण्यतिथी महोत्सव गेल्या पाच डिसेंबरपासून गोंदवल्यात सुरु आहे. येथील समाधी मंदिरात दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे. या महोत्सवाचा मुख्य दिवस येत्या रविवारी (ता. १४) असून पहाटे पाच वाजून ५५ मिनिटांनी श्रींच्या समाधीवर गुलाल- फुलांची उधळण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी शनिवारी दुपारपासूनच भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. श्रींचे समाधी मंदिर सातारा- लातूर महामार्गालगत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे. शनिवारी रात्री एक ते रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत पिंगळी (खांडसरी चौक) पासून गोंदवल्याकडे येणारा व गोंदवल्यातील मुख्य चौकापासून पिंगळीकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या मार्गावरील वाहतूक साताऱ्याकडून अकलूजकडे जाण्यासाठी पिंगळी (खांडसरी चौक) ते दहिवडीमार्गे राणंद माडींवरून म्हसवडकडून वळविण्यात येणार आहे. तसेच पंढरपूर बाजूकडून साताऱ्याकडे जाण्यासाठी म्हसवड ते मायणीमार्गे किंवा म्हसवड ते शिंगणापूर, फलटणमार्गे सातारा असा वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
सोमवारपासून पूर्ववत वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली. या वाहतूक मार्ग बदल लक्षात घेऊन वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





