satara | सातारा पालिका करणार दीडशे किलोवॅट वीजनिर्मिती

सातारा, (प्रतिनिधी) – स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने सातारा पालिकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. सोलर पॅनेलद्वारे पालिका दीडशे किलोवॅट वीजनिर्मिती करणार आहे. त्यामुळे पालिकेची वीज बिलाची दरमहा 75 हजार आणि वार्षिक नऊ लाख रुपयांची बचत होणार आहे. असा उपक्रम राबवणारी सातारा ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव पालिका ठरणार आहे.
पारंपरिक इंधनांचे मर्यादित साठे, त्यांचा बेसुमार वापर यामुळे भविष्यात इंधनाभावी मोठी अडचण होणार आहे. केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सातारा पालिकेने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याचे ठरवले आहे.
शाहू कला मंदिर, सांबरवाडी फिल्टरेशन प्लँट, आयुर्वेदिक गार्डन व सोनगाव कचरा डेपो येथे सोलर संच उभारण्यात येत असून, या चारही ठिकाणचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात जाण्यासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पाऊल उचलले आहे. सांबरवाडी फिल्टरेशन प्लँट व शाहू कला मंदिर येथे रूफ टॉप सोलर पॅनेल्स बसवण्यात येत आहेत.
यासह आयुर्वेदिक गार्डन व सोनगाव कचरा डेपो येथेही प्रत्येकी 12 सोलर पॅनेल्स बसवले जातील. पावसाळ्याचे चार महिने वगळता, इतर आठ महिन्यांमध्ये सौर ऊर्जा संचलित केली जाणार असून, त्यातून चार ठिकाणचे पथदिवे आणि पाणी उपशासाठी लागणारी ऊर्जा उपलब्ध होणार आहे.
हे पाऊल टाकणारी सातारा ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पालिका ठरणार आहे. केंद्र शासनाने सौरचूल योजना कार्यान्वित केली आहे. त्या धर्तीवर सातारा पालिका सौर ऊर्जा निर्मिती करणार असून, यामुळे पालिकेचे वीज बिलाचे दरमहा 75 हजार रुपयांप्रमाणे वर्षाकाठी तब्बल नऊ लाख रुपयांची बचत होणार आहे.





