Satara : कृष्णा नदीवर वेणेगाव येथे नवा पुल उभारण्याच्या हालचाली

नागठाणे : वेणेगाव (ता. सातारा) येथे कृष्णा नदीवर कोपर्डे गावास जोडणारा नवा पुल उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्या अनुशंगाने काल दि. ९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागास संलग्न असणाऱ्या कराड कार्यालयाकडून सर्वेक्षण झाल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या पुलाची निर्मिती झाल्यास कोपर्डे विभागातील दळणवळण आणखी सुलभ होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष बाबुराव घोरपडे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून नांदगाव येथे कृष्णा नदीवर पुल बांधुन घेतला होता. त्याचे उद्धाटन तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या हस्ते झाले होते. त्याचवेळी सातारा तालुक्यातील अजुन एक वजनदार नेते स्व. बाळासाहेब कदम यांनी अशाच पद्धतीचा पुल वेणेगाव व कोपर्डे गावच्या मध्ये कृष्णा नदीवर व्हावा अशी मागणी लावून धरली होती. पण काही कारणास्तव ती पूर्ण झाली नाही. परंतु, वेणेगाव येथेच कोल्हापूर टाईप बंधाऱ्याची निर्मिती झाली व पर्यायाने कोपर्डे व इतर गावांसाठी बंधाऱ्यावरून का होईना रस्ता मिळाला. त्याच रस्त्यावरून वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीवेळी बंधाऱ्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांचा भार सोसण्याची या बंधारा पुलाची क्षमता आहे की नाही हा प्रश्नच आहे. तरीही जीव धोक्यात घालून त्यावरून वाहतुक सुरू आहे.
सध्या या मतदार संघात सत्तापरिवर्तन झाले आहे. नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे जनतेने नव्याने केलेल्या मागणीचा विचार करून त्यांनी सां. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते. त्याप्रमाणे नवीन भुसंपादन न करता, शेतकरी हित जोपासत याच पुलाच्या जागी अथवा शेजारी नव्या पुलाची निर्मिती करता सर्वेक्षण करण्याच्या सुचना केल्या होत्या.
त्यानुसार काळ दि. ९ रोजी सर्वेक्षण झाले असुन त्याचे डिझाईन करून अंदाजपत्रक तयार करून शासन दरबारी मंजुरीसाठी पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे दिसत आहे. मंजुरी मिळाल्यावर येथे नवा पुल उभारल्यास कोपर्डे विभागाचा दळण वळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याने नागरिकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.





