Satara: अल्पवयीन विद्यार्थिनीची माणगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या; दहिवडी येथील घटना

दहिवडी – येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आज मंगळवारी माणगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे आज शाळेत आली होती. परंतु, दप्तर शाळेमध्ये ठेवून ती कुठेतरी गेली असल्याचे शिक्षकांच्या निर्दर्शनास आले. शिक्षकांनी हे तिच्या आईला फोन करून सांगितले.
आईने अनेक ठिकाणी शोध घेतला. जवळच्या नातेवाइकांना फोनवरून विचारणा केली. परंतु, कुठेच तपास न लागल्याने आई शाळेजवळ येऊन थांबली.
मुलगी दप्तर घेण्यासाठी येणार म्हणून आई तिथेच थांबून राहिली. चार वाजण्याच्या सुमारास मुलगी शाळेजवळ आली. आईला पाहताच ती मारण्याच्या भीतीने पळू लागली. आई हातात काठी घेऊन तिच्या मागे लागली.
आई जास्त मारेल या भीतीने ती माणगंगा नदीच्या दिशेने पळत सुटली. मार खाण्याच्या भीतीने तिने नदीच्या पुलावरून उडी मारली. आईने आरडाओरडा करून नागरिकांना जमविले. परंतु, शोध घेण्यास उशीर लागला. अखेर मुलीला पाण्यातून बाहेर काढले आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.





