Satara : म्हसवड पोलीसांनी घेतले दोन संशयितांना ताब्यात

म्हसवड : अल्पवयीन मुलींच्या अपहरण अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील संशयितांना पोलीसांनी पंढरपूर आणि कराड येथून ताब्यात घेतले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत म्हसवड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मोटेवाडी वरकुटे म्हसवड आणि वडजल या दोन ठिकाणांवरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे या दोन्ही गुन्ह्यांतील मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शोधून ताब्यात घेण्यात आले आहे.
अक्षय सोनवणे तपास करीत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, हवालदार मैना हांगे, पोलीस नाईक अमर नारनवर, कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे, कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी ही कामगिरी केली.





