Satara : महाबळेश्वरच्या घरपट्टीचा वाद मिटवावा

महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या घरपट्टीबाबत सकारात्मक पाऊल उचलून प्रशासनाने जुन्या दरामध्ये घरगुती वापरासाठी १५ टक्के व व्यावसायिक वापरासाठी ३० टक्के दराची वाढ करुन स्थानिकांना दिलासा द्यावा तसेच व्यावसायिक वापरासाठी श्रेणी पध्दत करुन केलेल्या भरमसाठ वाढीच्या घरपट्टीचा वाद मिटविण्याचा निर्णय घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी तशा सूचना मुख्याधिकारी योगेश पाटील यांना दिल्या.
महाबळेश्वर येथील सध्या ऐरणीवर असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी विषयाच्या चर्चेसाठी ना. मकरंद आबा पाटील यांनी येथील ग्रेस कॉटेजमध्ये मुख्याधिकारी योगेश पाटील व शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीमध्ये प्रथम मुख्याधिकारी पाटील यांनी घरपट्टीबाबत सविस्तर माहिती दिली. याबाबत स्थानिकांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर ना. पाटील यांनी २०११- १२ च्या दरामध्येच घरगुतीसाठी १५ टक्के व व्यावसायिक वापरासाठी ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय दिला.
यावेळी नव्याने कर आकारणीची दरवाढ करत असताना अ, ब, क अशी व्यावसायिक श्रेणी निर्माण केल्यामुळे व्यावसायिकांवर सुमारे चौपटीपेक्षा जास्त दराने ही भरमसाठ दरवाढ प्रशासनाकडून लादली गेली होती. ती प्रक्रिया रद्द करुन जुन्या दरात वाढ होणे आवश्यक असल्याचे माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ना. पाटील यांनी जुन्या दरात १५ व ३० टक्के वाढ करण्याबाबत मुख्याधिकारी योगेश पाटील यांना सूचना केल्या. न्यायालयीन प्रक्रियेत न जाता प्रशासनाने व सर्व मिळकतधारकांनी देखील आपली न्यायालयातील दावे काढून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. या निर्णयाचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
भुयारी वीज वितरणविषयी देखील लवकरच मार्ग निघेल तसेच महाबळेश्वर, पाचगणी व दरम्यानचा असलेला रस्ता हे सर्व भुयारी वीज वितरण करुन देऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या बैठकीस राजेंद्रशेठ राजपुरे, रमेश चोरमले, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, डी. एम. बावळेकर, विमलताई पार्टे, ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, दत्ता वाडकर, विशाल तोष्णीवाल, रोहित ढेबे, प्रकाश पाटील, विजय नायडू, सतीश ओंबळे, राजेंद्र पवार, महेश कोमटी, रवींद्र कुंभारदरे, सचिन गुजर, ओंकार दीक्षित, सुनील ढेबे, गोविंद कदम, राजेंद्र पंडित, उस्मानभाई खारकंडे, तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. महायुतीच्यावतीने शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू यांनी आभार मानले.
पाणीप्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही
शहराचा पाणीपुरवठा, जीवन प्राधिकरणाचा दर तसेच धरण, धरणाची गळती, पाण्याची नासाडी व त्याचा पालिकेवर लादला जाणारा आर्थिक भुर्दंड याबाबत या बैठकीत चर्चा झाली. जीवन प्राधिकरणाकडे ही योजना हस्तांतरित न करता पालिकेला बिले भरुन सहकार्य करत चालवावी, असा सल्ला ना. पाटील यांनी लोकप्रतिनिधींना दिला. अन्यथा जीवन प्राधिकरणाकडून सक्तीच्या वसुलीला सामोरे जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागेल अशी माहिती त्यांनी दिली. जादा दर असून पालिकेचे २५ कर्मचारी पाणीपुरवठा देखभालीसाठी असल्याने या पाणी योजनेबाबत तोडगा काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ मुख्य अभियंत्यांबरोबर बैठक आयोजित करु, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले.





