पडघम विधानसभेचे कोरेगाव मतदारसंघ

श्रीकांत कात्रे
कोरेगाव मतदारसंघ जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा राहिला आहे शिंदे आडनावाच्या दोन आमदारांच्या संघर्षामुळे. दोघेही नेहमीच संघर्षाच्या पवित्र्यात असतात. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहतात. दोघेही आक्रमक आहेत. दोघांत टस्सल असल्यामुळे दोघेही मतदारसंघ पिंजून काढतात. काँग्रेसच्या विचारांबरोबर राहिलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत बदल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून शिवसेनेने हा मतदारसंघ खेचून घेतला. आता राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ पुन्हा मिळवायचा आहे. तर शिवसेनेला तो टिकवायचा आहे. या संघर्षात दोन्ही नेत्यांची चुरस रंगण्याची शक्यता अधिक आहे…
कोरेगाव मतदारसंघ अनेकदा राज्यामध्ये चर्चेत राहिला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या विचारांचा राहिला. शंकरराव जगताप, डॉ. शालिनीताई पाटील यांसारख्या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अनेक वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी पेललेले आमदार शशिकांत शिंदे आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांचा हा मतदारसंघ. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधून कार्य करत स्वतःची स्वतंत्र प्रतिमा तयार करणारे आमदार शशिंकात शिंदे यांनी या मतदारसंघातून २००९ व २०१४ अशा दोन निवडणुका जिंकल्या.
त्यापूर्वी ते १९९९ व २००४ मध्ये जावळी मतदारसंघातून विजयी झाले होते. मतदारसंघाच्या बाहेरून येऊन निवडणूक लढवत शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटविला. त्यात प्रामुख्याने त्यांना सत्तेत नेहमीच मिळालेले स्थान. मंत्रिपदे. जलसंधारणासारखे खाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेपद.त्यामुळे ते सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. नवी मुंबईत माथाडी कामगारांचे नेते ते जावळी मार्गे कोरेगाव मतदारसंघातील आमदार असा त्यांचा आक्रमक झंझावात राहिला.
या दिग्गज झंझावाताला २०१९ च्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी रोखले. खटावसारख्या छोट्या गावातून ते आले. राजकारणातील गटबाजीचा अड्डा असणाऱ्या खटाव विधानसभा मतदारसंघातील डावपेच लहानपणापासून पाहणारे महेश शिंदे धाडसाने पुढे येत राहिले. खटाव विधआनसभा मतदारसंघात केशवराव पाटील आणि चंद्रहार पाटील या दोन नेत्यांच्या गटांमधील संघर्ष कडवा होता. तालुक्यातील गावागावांत ही गटबाजी भिनली होती. पुढे भाऊसाहेब गुदगे यांच्या रुपाने मिळालेल्या लोकप्रतिनिधीमुळे गटबाजीचे स्वरुप बदलले.
मात्र, या वातावरणात महेश शिंदे लहानाचे मोठे झाले. दोन्ही पाटलांमधील संघर्ष त्यांनी जवळून अनुभवला होता. नकळत संघर्ष करणारे मन तयार झाले. जिल्हा परिषदेच्या मैदानापासून आमदारकीपर्यंत संघर्ष झेलत महेश शिंदे यांची वाटचाल सुरु झाली. ती आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. शशिकांत शिंदे यांच्यासारख्या राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्त्वाला पराभूत करत त्यांनी विधीमंडळात प्रवेश केला. गेली पाच वर्षे कामांचा धडाका लावत आणि गावोगावी संपर्क वाढवत आपले अस्तित्त्व मजबूत केले आहे. शरद पवार यांनाकोरेगावचा हा पराभव जिव्हारी लागला. शशिकांत शिंदे यांना त्यांनी विधानपरिषदेत संधी दिली. या पार्श्वभूमीवर आता होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही आमदारांच्या संघर्षाची तीव्रता अधिक वाढली आहे.
दोन्ही बाजूंनी निवडणुकीपूर्वीच अक्षरशः कडवी झुंज सुरु आहे. राज्यातील बदललेल्या राजकारणात शशिकांत शिंदे एकनिष्ठ राहिले ते शरद पवार यांच्याशीच. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांनाच उमेदवारी दिली. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारख्या मातब्बर नेत्याशी त्यांनी मोठ्या तडफेने लढत दिली. निसटत्या मतांनी ते पराभूत झाले. आणि आता पुन्हा जिंकायचेच या जिद्दीने ते पुन्हा कोरेगावच्या मैदानातून उतरणार आहेत. मद्यंतरी या मतदारसंघातून रोहित पवार निवडणूक लढवतील या चर्चेने जोर धरला होता. पण तशा प्रकारची कोणतीही हालचाल पक्षाकडून नाही आणि पवार यांच्याकडूनही नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे हेच या रिंगणात असतील याची खात्री राजकीय वर्तुळात आहे.
दुसऱ्या बाजूला महेश शिंदे यांच्यावरही जोरदार टीकाटीपणी आरोप होत असले तरी त्याची दखलही न घेता महेश शिंदे यांनी आपल्या विकास कामांकडेच लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट दिसून येत हे. गावोगावी संपर्क साधत आपला संघर्ष त्यांनी कायम ठेवला आहे. त्यातच आता त्यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने त्यांना पाणीप्रश्न मार्गी लावण्याची जणू संधीच मिळाल्यासारखे वातावरण त्यांनी निर्माण केले आहे. त्यांचे हे काम मतदारसंघापुरते मर्यादित नाही. मंत्रिपदाचा दर्जा लाभल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.
कोरेगाव मतदारसंघात सध्या कोरेगाव तालुकयाचा काही भाग तसेच खटाव आणि सातारातालुक्याचा काही भाग समाविष्ट आहे. २००४ च्या निवडणुकीपर्यंत खटाव मतदारसंघ स्वतंत्र होता. पहिल्या १९५२ च्या निवडमुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे तात्याराव आनंदराव जाधव विजयी झाले. १९५७ मध्ये केशवराव शंकरराव पाटील (प्रजा सोशॅलिस्ट पार्टी), १९६२ मध्ये शिवाजीराव दादासाहेब पवार (काँग्रेस), १९६७ – चंद्रहार पाटील (काँग्रेस), पुन्हा केशवराव शंकरराव पाटील १९७२ मध्ये अपक्ष, १९७८ व १९८० मध्ये काँग्रेसकडून विजयी झाले. १९८५ मध्ये तिरंगी लढतीत काँग्रेस (एस) च्या लक्ष्मणराव जाधव यांनीही चांगली लढत दिली. या लढतीत अपक्ष मायणीचे भाऊसाहेब (मोहनराव) पांडुरंग गुदगे विजयी झआले. मग १९९० ला गुदगे काँग्रेसकडून, १९९५ मध्ये अपक्ष म्हणून आणि १९९९ मध्ये भाऊसाहेब गुदगे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रथमच खटावमधून विजय नोंदविला. त्यावेळी डॉ. दिलीप येळगावकर यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ च्या निवडणुकांमध्ये मतदारसंंघांच्या पुनर्रचनेच खटाव मतदारसंघच गायब झाला. माण, कोरेगाव आणि कराड उत्तर अशा तीन मतदारसंघांत खटाव तालुका विभागला गेला.
त्यापूर्वीच्या कोरेगाव मतदारसंघात १९७२ मध्ये कोरेगावचे दत्ताजीराव बर्गे अपक्ष म्हणून विजयी झाले. मात्र, इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस विचारानेच बाजी मारली आहे. १९५२ शंकरराव गणपतराव घार्गे, १९५७ विश्वासराव विठ्ठलराव माने, १९६२ तुषार पांडुरंग पवार, १९६७ ए. एन. फाळके, १९७८, १९८०, १९८५, १९९०, १९९५ अशा पाच निवडणुका शंकरराव चिमाजीराव जगताप (काँग्रेस) यांनी जिंकल्या. १९९९ व २००४ मध्ये डॉ. शालिनीताई पाटील आणि २००९ व २०१४ मध्ये शशिकांत शिंदे या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. अशा या काँग्रेस विचाराला शहर देण्याचे काम महेश शिंदे यांनी केले. २०१९ मध्ये महेश शिंदे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला.
संघर्षाचा निकाल सातारा तालुक्याच्या हाती
सातारा तालुक्यातील काही गावे या मतदारसंघात समाविष्ट आहेत. या गावांमध्ये भाजपचे राजघराण्यातील नेते खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व आहे. या गावांमध्ये शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोघांचाही दांडगा संपर्क आहे. धोघांचेहीनेटवर्क चांगले आहे. कार्यकर्त्यांचे पाठबळ दोघांनाही आहे. महेश शिंदे युतीचे उमेदवार असल्याने दोन्ही महाराजांच्या वर्चस्वाचा फायदा त्यांना मिळू शकतो, असे कागदावरील चित्र आहे. प्रत्यक्ष रणांगणात कोणाची भूमिका कशी राहते ती या संघर्षांचा निकाल ठरविण्याची शक्यता आहे.





