Satara : कर्मवीर विद्यापीठाला निधी मिळण्याची मिळाली ग्वाही

पुसेगाव : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ५५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी विद्यापीठास मिळवून देण्यासाठी राज्यपाल कार्यालयाकडून विशेष प्रयत्न केले जातील, तसेच विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयांतील रिक्त जागांची भरती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही बैठकीत देण्यात आली.
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आयोजित आढावा बैठकीत विद्यापीठात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, मराठी भाषा व अन्य भारतीय भाषांचे शिक्षण याबाबत माहिती देण्यात आली.
विद्यापीठातील विविध पायाभूत सेवा सुविधा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, गुणवत्ता सुधार, विद्यापीठाद्वारे राबविले जाणारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, कौशल्य विकास अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभव देण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, विदेशी भाषा प्रशिक्षण व्यवस्था, माजी विद्यार्थी संघटनांचा विद्यापीठ विकासात सहभाग, आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविणे, वसतिगृह सुविधा, क्रीडा विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम यांबाबत आढावा घेतला.
विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कामकाज उत्तमरित्या सुरू असून विद्यापीठाद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली. या बैठकीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार व संचालक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) प्रा. डॉ. महेंद्र अहिरे, राज्यपाल कार्यालयातील अधिकारी विकास कुलकर्णी व उमेश काशीकर उपस्थित होते.





