Karad News : मृत्यूनंतरही मरणयातना! अर्धवट जळालेला मृतदेह पुरात वाहून गेला; पाटण तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Karad News : सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्याला बुधवारी दुपारी ३ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत ढगफुटीसदृश पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

Karad News : कराड व पाटण तालुक्याला ढगफुटीसुदृश्य पावसाने बुधवारी दुपारी तीन वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत झोडपून काढले. या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पाटण शहरातील अनेक घरांत तसेच दुकानात यावेळी पाणी गेले. (Karad News)
कुसरूंड, सुळेवाडी आणि तामकणे येथील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती. तर ढोरोशी गावाजवळील शिवपुरी रस्त्यावरील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेला एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह पुराच्या पाण्यातून वाहून गेला. (Karad News)
कराड शहरासह कराड- चिपळूण मार्गावर मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ आणि निसरे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी रस्त्यावर साचले आहे. निसरे फाटा येथे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Karad News)
मुसळधार पावसामुळे कराड- चिपळूण वाहतूक मार्गावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या मार्गावरील निसरे आणि मल्हारपेठ परिसरात पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की, संपूर्ण रस्ते आणि आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून सर्वत्र ‘पाणीच पाणी’ पाहायला मिळत आहे. (Karad News)
पाटण तालुक्यात आतापर्यंत ७८ घरांच्या पडझडी झाल्या आहेत. पाटण शहरात शिवलिंग मंदिर परिसरात नदीचे स्वरूप आले असल्याने अनेक घरांत पाणी घुसले होते. रामपुर ते जुना स्टॅण्ड परिसरात नाल्यांच्या अर्धवट कामामुळे रस्त्याच्या दुतर्फा पाणीच पाणी साचले होते. दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. नव्याने बांधण्यात आलेला धांडे पुलाला पाणी घासून जात होते. (Karad News)
ढोरोशीत पुराच्या पाण्यातून मृतदेह वाहून गेला
ढोरोशी (ता. पाटण) येथे ओढ्यालगत मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच आलेल्या मुसळधार पावसाने व त्यात ओढ्याला आलेल्या पुरात अर्धवट अवस्थेत दहन झालेला मृतदेह पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याची घटना घडली. ढोरोशी गावचे ज्येष्ठ नागरिक साहेबराव मारुती मुळीक यांचे निधन झाले. (Karad News)
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओढ्यालगत असलेल्या गावच्या स्मशानभूमीत नेण्यात आले. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर मुलाने वडिलांना मुखाग्नी दिला. चितेने नुकताच पेट घेतला होता आणि अचानक आकाश काळवंडले. काही क्षणांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. (Karad News)
पावसाचा जोर एवढा वाढला की शेजारच्या ओढ्याला महापूर आला. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत गेली आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोरच पेटती चिता विझली. अर्धवट जळालेली लाकडे आणि मृतदेह प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. (Karad News)





