Satara : जेएनपीटी ड्रग्ज प्रकरणाचा सखोल तपास करावा

सातारा : मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात जेएनपीटी येथे 200 किलो ड्रग्ज पकडले होते. या ड्रग्ज प्रकरणात कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथील दोन युवकांची चौकशी करण्यात आली होती. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. रोजंदारीवर काम करणार्या मुलांकडे 200 कोटींचे ड्रग्ज कसे असू शकतील? या प्रकरणात अटक झालेला युवक मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा आहे. गुरुनाथ चिंचकर यांनी शुक्रवारी घरात स्वतःला गोळी मारून, आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये निष्पाप लोकांना त्रास दिला जाऊ नये, असे वाक्य आहे. त्यांना एका बड्या राजकीय नेत्याने दहा कोटी रुपये मागितल्याचा दावा करत, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी सातारा येथे केली.
आमदार महेश शिंदे म्हणाले, ज्या रिव्हॉल्व्हरने चिंचकर यांनी आत्महत्या केली, ते सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होत नाही. त्यांना हे पिस्तूल कोठून मिळाले? 200 कोटींच्या अंमली पदार्थप्रकरणी चिंचकर यांचा मुलगा नवीन याला अटक झाली होती. त्याचबरोबर बिचुकले, ता. कोरेगाव येथील दोन युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी सिद्धेश पवार हा गावाचा उपसरपंच असून, तो अद्याप बेपत्ता आहे. तो जिवंत आहे की नाही, त्याच्या जिवाचे काही बरेवाईट झाले आहे, हे शोधणे गरजेचे आहे.
200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ बाळगणारे ड्रग्ज पेडलर बिचुकलेसारख्या छोट्या गावात तयार होत असतील, तर हा गंभीर विषय आहे. या प्रकरणाचा गृह मंत्रालयाने गांभीर्याने तपास करावा. हा प्रश्न मी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला होता. तेव्हा, या प्रकरणाचा सखोल तपास करून, माहिती दिली जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्र्यांनी दिले होते.
मात्र, बिचुकले येथील त्या युवकांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ते इतक्या मोठ्या प्रकरणात सहभागी असतील, असे वाटत नाही. चिंचकर यांच्या मुलाचे नाव केसमधून काढण्यासाठी एका राजकीय पक्षाचा बडा नेता आणि पोलीस अधिकारी त्यांना दहा कोटी रुपये मागत होता, असे गुरुनाथ चिंचकर यांनी चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा.





