Satara : पाटण तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोडीला जोर

कराड : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात विशेषतः ढेबेवाडी खोऱ्यामध्ये मनमानी वृक्षतोड होत असून यामुळे वनसंपदेचे कोट्यवधी रुपयांची नुकसान होत आहे. ही वनसंपदा कोणाच्या आशीर्वादाने तोडली जात आहे हे समजायला मार्ग नाही, असा आरोप काजिरेवाडी (ता. पाटण) येथील शेतकरी अनिल काजिरे यांनी करत साताऱ्यात उपवनसंरक्षकांच्या कार्यालयासमोर दि. १० जून रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
अनिल काजिरे गेल्या काही वर्षापासून ढेबेवाडी खोऱ्यामध्ये होत असलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र ,येथील वन विभागाचे कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन संबंधित ठेकेदारांवर कोणतीही कारवाई करत नाहीत. दहा झाडे तोडीची परवानगी असताना तब्बल 30 ते 40 झाडे तोडली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. दिवसभर वृक्षतोड करून लाकूडफाट्याचा साठा करायचा आणि रात्री कोणताही परवाना नसताना ट्रकमधून तो लाकूडफाटा गायब करायचा असा सर्रास उद्योग पर्यावरण मंत्री शंभूराज देसाई यांच्या तालुक्यात सुरू आहे.
या वनउपजांमध्ये चंदन व सागाची झाडे वारंवार तोडली जात आहेत. ही झाडे दुर्मिळ प्रजातीच्या संवर्ग एकमध्ये येतात लाकडांचा टिकाऊपणा जास्त असल्यामुळेच या झाडांची तोड अधिक होत आहे. ढेबेवाडी खोऱ्यातील वनसंपदेची तोड होत असल्यामुळे येथील जमिनीची धूप होऊन शेतीचे नुकसान होत असल्याचा काजिरे यांचा आरोप आहे.
यासंदर्भात ढेबेवाडी वन विभाग व सातारा वन विभाग यांच्याशी काजिरे यांनी वेळोवेळी संपर्क करून याबाबत दाद मागण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळा बेकायदा वृक्षतोड त्यांनी निदर्शनास आणून दिली. मात्र, वन विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप काजिरे यांनी केला. सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी चौकशी अहवालाचे आश्वासन देऊन आपली बोळवण केल्याची काजिरे यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर दिनांक दहा रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.





