Satara : माण तालुक्यातील शेकडो एकर वृक्षसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी

दहिवडी : ऐन उन्हाळ्यात अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत माण तालुक्याच्या पश्चिम भागातील शेकडो एकर वृक्षसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामुळे आग लावणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा, अशी मागणी संतप्त पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
माणच्या पश्चिम भागात भांडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत मलवडीच्या श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्टच्या मालकीचे ६५ एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रात मलवडीच्या अस्तित्व शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेने भांडवली ग्रामस्थांच्या सहकार्याने साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी वड, पिंपळ, आंबा, चिंच, करंज, शिसम आदी हजारो रोपांची लागवड केली आहे. यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या समूहाचे मार्गदर्शन तसेच दहिवडी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे सुध्दा सहकार्य लाभले आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी या परिसरात वृक्षसंपदा उत्तम जोपासण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी जैवसाखळी बहरली आहे. तसेच काळजी घेतल्याने या परिसरात गेली सात वर्ष एकदाही वणवा लागलेला नाही.
मात्र, दोन दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकांनी जाणीवपूर्वक या परिसरात दोन ठिकाणी आग लावली. आग लागल्याचे लक्षात येताच दत्ता बारसवडे व प्रवीण सूर्यवंशी यांना रस्त्याच्या बाजूला लावलेली एका ठिकाणची आग विझविण्यात यश आले. मात्र, या क्षेत्रात मध्येच असणाऱ्या एका वडाच्या झाडाखाली लावलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवताने पेट घेतला व आग भडकली. या आगीने काही वेळातच सर्व डोंगर व्यापला. आगीचा भडका एवढा होता की उभी झाडे पेटत होती.
यावेळी जनावरे चारत असलेल्या शबाना मुलाणी या महिलेने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीच्या तीव्रतेपुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. त्यानंतर राहुल सूर्यवंशी व इतर ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुध्दा आग विझवण्यास सहकार्य केले. सर्वांना आग विझविण्यात यश आले, तोपर्यंत शेकडो एकर क्षेत्र जळाले होते. या आगीत गवत तर जळालेच, सोबत शेकडो वृक्ष होरपळले, वन्यजीव मृत्युमुखी पडले.
भर दुपारी डोंगराला आग लागल्याचे दिसताच मी आग विझवण्यास सुरुवात केली. इतर जनावरे चारणारे सुध्दा मदतीला आले. दुपारी चार वाजल्यापासून रात्रीच्या आठ वाजेपर्यंत आम्ही आग विझवत होतो. या आगीत झाडांसह गवत जळाल्याने आमच्यापुढे जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे.
– शबाना मुलाणी (मलवडी)आम्ही जीवापाड जपलेली हजारो झाडे कोणातरी समाजकंटकांमुळे जळालेली बघून अतिशय वेदना झाल्या. आग लावणाऱ्या त्या समाजकंटकांना फासावरच लटकवलं पाहिजे.
– सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, अस्तित्व शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, मलवडी)वणवा लावणाऱ्यांची माहिती ग्रामस्थांनी आमच्यापर्यंत पोहचवावी. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
– अमित मुळीक (वनपरिक्षेत्र अधिकारी, दहिवडी)





