सातारा : परळी भागा मधील वडगाव येथे डोंगर पठारावर गायी चरत असताना पाय घसरून दरीत पडली होती. ही घटना समजताच नेचर अँड सोशल फाऊंडेशन टीम व गावातील काही तरुणांनी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता मुसळधार पाऊस सुरू असताना 100 ते 150 फूट खोल दरीत उतरून गायीला जीवदान दिले. एनएसएफ टीमच्या धाडसाचे कौतुक होत आहे. वडगाव गावाजवळ असलेल्या शिवारात वास्तव्यास असलेल्या आकाश शिंदे यांची जनावरे दि. 20 रोजी डोंगर पठारावर चरत असताना संध्याकाळी 5 वाजता एक गाय पाय घसरून खोल दरीत पडल्याची शिंदे यांचाच्या निर्देशनास आले. मुसळधार पाऊस असल्याने गाय रात्रभर दरीत होती. दुसर्या दिवशी सकाळी याबाबतची माहिती नेचर अँड सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास जगताप यांना मिळाली. याबाबत माहिती मिळताच एनएसएफ टीमचे सदस्य किरण अहिरे, सत्यजित गुजर,सागर सावंत, उमेश काळे, परळीमधील शांताई हॉटेलचे मालक संकेत दळवी हे दोरच्या साह्याने खोल दरीत उतरले. अवघ्या १२ वर्ष वयाचा राजवीर गुजर या छोट्या वीराने देखील खूप हातभार लावला. या वेळी जोराचा पाऊस सुरू असताना सुद्धा वडगाव ग्रामस्थांनी देखील धाव घेत गायीला खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी सातारा वनविभागाने दोरखंड उपलब्ध करून मदत केली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नाने दोरखंड लावून दरीत पडलेल्या गायीला वाचवण्यात यश आले. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी नेचर अँड सोशल फाऊंडेशनचे आभार मानले.