Satara : लोणंद येथील अतिक्रमणांवर आज पडणार हातोडा

लोणंद : लोणंद शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नगरपंचायत, एनएचआय, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आदी सर्व शासकीय यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी (दि. 10) येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीने जाहीर केले आहे.
दरम्यान, शासकीय जागेतील स्टॉल, खोकीधारक आणि टपरीवाल्यांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा मोहिमेत ती काढली जातील. त्यामुळे होणार्या नुकसानीस नगरपंचायत जबाबदार राहणार नाही, असे समाजमाध्यमांद्वारे जाहीर करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या या आवाहनाला प्रतिसाद देत लोणंद-शिरवळ रस्त्यावरील अनेक खोकीधारकांनी दोन दिवस आधीपासून अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास प्रारंभ केला.
शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी 29 जानेवारीला नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात पदाधिकारी, अधिकारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, एनएचआय, महावितरण कंपनी, व्यापारी व नागरिकांच्या झालेल्या बैठकीत लोणंद-सातारा, लोणंद-शिरवळ आणि लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शासकीय जागेतील अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार अतिक्रमण केलेल्या खोकीधारक, स्टॉलधारक व टपरीवार्यांना नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी भेटून, अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार लोणंद-शिरवळ रस्त्यावर शासकीय धान्य गोदामासमोरच्या खोकीधारकांनी अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, सोमवारी (दि. 10) अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीने सोशल मीडियावरून जाहीर केल्याने, अतिक्रमणे काढून घेण्यास वेग आला आहे.
स्टॉलधारकांचे होणार पुनर्वसन
अतिक्रमण हटाव मोहिमेत काढण्यात आलेल्या स्टॉलधारक व टपरीवाल्यांचे बसस्थानकासमोर आणि बाजारतळ येथे शासकीय जागेत तात्पुरते पुनर्वसन करण्याचा आणि गणपती मंदिरासमोरच्या जागेत चारचाकी आणि शांतीकाका सराफ दुकानाच्या मागील बाजूस शासकीय जागेत दुचाकी वाहनांसाठी पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या मोहिमेस सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.





