Satara : सातारा पंचायत समितीत उद्या तक्रार निवारण दिन

सातारा : सातारा पंचायत समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. ४) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी दिली.
शंभर दिवस कृती कार्यक्रमामध्ये तक्रार निवारणाला प्राधान्य देत पंचायत समितीच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत विविध सुविधा व सेवा त्याचबरोबर दाखले, मिळकत नोंदी, वारस नोंदी या बाबीवर कार्यवाही केली जात असते. अनेक वेळा ग्रामपंचायत स्तरावर विविध कारणांमुळे यामध्ये चुका व अनियमित्ता होत असते.
दि. 3 मार्च 2020 रोजी ग्रामविकास व पंचायत राज विभाग शासन निर्णय द्वारे ग्रामपंचायत स्तरावरील झालेल्या चुका, अनियमितता दुरुस्ती करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून अपील लावून तक्रार निवारण करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. याचाच भाग म्हणून मागील तीन महिन्यांमध्ये प्रभावीपणे अनेक तक्रारींचे सातारा पंचायत समितीमध्ये निवारण करण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या शुक्रवारी आयोजित तक्रार निवारण दिनात १२ तक्रारीं,मार्च महिन्यात २० तक्रारींचा तर एप्रिल महिन्यात शुक्रवारी होणाऱ्या तक्रार निवारण दिनात १५ तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये तक्रारींचा निपटारा सुरु आहे. सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत संबंधित काही न सुटलेले प्रश्न असतील तर सातारा पंचायत समितीमध्ये अर्ज देवून आपल्या तक्रारीचा निपटारा करुन घ्यावा, असे आवाहन सतीश बुध्दे यांनी केले आहे.





