Satara : ग्रेड सेपरेटर, दुभाजकावर फ्लेक्स लावल्यास कारवाई

सातारा : पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर व दुभाजकांमध्ये फ्लेक्स लावण्यास पालिका प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्णयाची गेल्या आठवडाभरापासून अंमलबजावणी करण्यात आली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे.
सातारा शहरात गेल्या एक-दीड वर्षांपासून फ्लेक्स लावण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पूर्वी गल्लीबोळात व मुख्य रस्त्यांवर फ्लेक्स लावले जात होते. ही जागा देखील फ्लेक्सधारकांना अपुरी पडू लागल्याने ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर तसेच दुभाजकांमध्ये फ्लेक्स लावण्याची नवी पद्धत शहरात सुरू झाली. पालिकेच्या परवानगीविना लावल्या जाणाऱ्या या फ्लेक्समुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता, शिवाय शहराचेदेखील विद्रुपीकरण सुरू होते.
या विद्रुपीकरणाला चाप लावण्याचा निर्णय मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी घेत साताऱ्यातील ठराविक झोनमध्ये फ्लेक्सला बंदी घातली आहे. या निर्णयाचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे फ्लेक्समुळे शहराच्या होणाऱ्या विद्रुपीकरणाला चाप लागेल अशी अपेक्षा आहे. यापुढे बंदी घातलेल्या ठिकाणांवर फ्लेक्स लावण्याचे धाडस केल्यास संबंधिताला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही मुख्याधिकारी बापट यांनी दिला आहे.
या ठिकाणी असेल बंदी
१. ग्रेड सेपरेटरवरील भिंती
२. पोवई नाका ते बगाडे हॉस्पिटल
३. बस स्थानक ते पोवई नाका
४. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट
५. पोवई नाका ते गोडोली चौक
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील नियमबाह्य फ्लेक्स, बॅनर तसेच होर्डिंग हटविण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली आहे. तसेच यापुढे महत्त्वाच्या ठिकाणी फ्लेक्स लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे संबंधितांनी काटेकर पालन करावे.
– अभिजीत बापट (मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका)





