कोयनानगर (विजय लाड,प्रतिनिधी) :- राज्यातील भूकंपग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या भूकंपग्रस्त दाखल्यांचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येत बदल करण्यास मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश काढला आहे.
भूकंपग्रस्त दाखला हस्तांतरण होत असल्याने हा दाखल्याचा वापर भूकंपग्रस्तांच्या पणतू व खापरपणतूपर्यंत होणार आहे. सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी कोयना भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या पाठपुराव्याचा फायदा राज्यातील सर्व भूकंपग्रस्तांना होणार आहे. सातारा, लातुर, उस्मानाबाद हे भूकंपग्रस्त जिल्हे आहेत.
सातारा जिल्ह्य़ातील कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला ११ डिसेंबर रोजी ५५ वर्षं पूर्ण होत आहेत. भूकंपग्रस्त तालुक्यातील युवकांना शासकीय सेवेत नियुक्तीसाठी भूकंपग्रस्त दाखला महत्वाचा आहे.
भूकंपग्रस्त युवकांना नोकरीत २ टक्के आरक्षण आहे. मूळ भूकंपग्रस्तांचा शासन निर्णय व त्यातील व्याख्येनुसार पात्र असलेल्या मूळ भूकंपग्रस्तांच्या वारसदारांना याचा लाभ मिळण्यास अडचणी असल्याने भूकंपग्रस्तांच्या ४ पिढ्या संपल्या आहेत.
११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना खोऱ्यात झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे पाटण तालुक्याची ओळख भूकंपप्रवण तालुका अशी झाली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी भूकंपग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करून त्यांना भूकंपग्रस्त दाखले देण्याची प्रक्रिया चालू केली होती. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने पाटण तालुक्यात भूकंपग्रस्तांना दाखले देण्याची प्रक्रिया बंद केली होती. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये शंभूराज देसाई यांनी भूकंपग्रस्तांना दाखले देण्यासाठी शासनाबरोबर संघर्ष करून ही प्रक्रिया सुरू केली आहे.
भूकंपग्रस्त दाखल्याचा उपयोग भूकंपग्रस्तांच्या वारसांना व्हावा ही भूकंपग्रस्तांची मागणी पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांनी या व्याख्येमध्ये सुधारणा करण्याची मागणी शासनाकडे केली होती.
मूळ भूकंपग्रस्त मृत पावला असेल अथवा तो वयोमानानुसार शासकीय नोकरीसाठी पात्र ठरत नसल्यास त्याच्या पात्र कुटुंबीयांस हे प्रमाणपत्र हस्तांतरण करण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली आहे.
इतिहासाचे पुनर्लेखन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही – अमित शहा
हस्तांतरण प्रक्रियेला परवानगी मिळाल्याने भूकंपग्रस्तांच्या पुढील पिढीतील नातु, नातूची पत्नी, नात, पणतू,पणतूची पत्नी ,खापर पणतू ,पणती, खापरपणतूची पत्नी यांना या दाखल्याचा लाभ होणार आहे.