Satara : तणावमुक्त होऊन बोर्ड परीक्षेला सामोरे जावे

सातारा : ‘शालेय वयात दहावी आणि बारावी इयत्तांच्या परीक्षांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. शालेय जीवनात हा टप्पा करियरसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थी या दोन इयत्तांच्या परीक्षांसाठी अभ्यासाची विशेष तयारी करतात. विषयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास, उजळणी व प्रश्नपत्रिकांचा सराव करणे हेच या परीक्षांचे गमक आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे’, असा संदेश राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.
कोल्हापूर विभागीय मंडळ, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांच्या ‘जिल्हास्तरीय ऑनलाइन उद्बोधन’ सत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
गैरप्रकारमुक्त परीक्षा अभियानांतर्गत विभागीय मंडळ अधिनस्त सातारा, सांगली व कोल्हापूर येथे सर्व शाळाप्रमुखांच्या परीक्षा योजना व सुविधांबाबत ऑफलाइन सभा, त्यानंतर शाळास्तरावर विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या ऑफलाइन सभा, परीक्षार्थींना कॉपीमुक्तीची शपथ असे नानाविध उपक्रम मंडळाने केले. परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधांची तयारी सुरू असून मंडळाने विद्यार्थ्यांसाठी तिन्ही जिल्ह्यात ऑनलान उद्बोधक चर्चासत्रांचे आयोजन केले. अध्यक्ष क्षीरसागर यांच्याच संकल्पनेतून या चर्चासत्राचे आयोजन झाले. उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, मुख्याध्यापक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नलावडे, जिल्हाध्यक्ष नितीन कोंडे प्रमुख उपस्थित होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर व मुख्याध्यापक संघाने ऑनलाइन चर्चासत्राचे उत्तम नियोजन केले होते. या उद्बोधन सत्रात सहभागी विद्यार्थी,पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सर्व उद्बोधन सत्राचे आभासी पद्धतीने यूट्यूब समाजमाध्यमांद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ देण्यात आला.
“विभागीय मंडळाकडून राज्यात पहिल्यांदाच असा अनोखा व उपयुक्त उपक्रम घेण्यात आला. सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांनी युट्युब लाईव्हद्वारे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रक्षेपण केले. हा उपक्रम बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
-सचिन नलावडे, प्रदेश उपाध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ
उपलब्ध कालावधीत दहावी,बारावी परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळापत्रकासंदर्भात विजय येवले यांनी मार्गदर्शन केले. परीक्षापूर्व आणि परीक्षा काळात आरोग्य कसे सांभाळावे, कोणता आहार घ्यावा, याबाबत डॉ. विजयकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शिवाय तणावमुक्तीसाठी काही कृती करण्याबाबत गणेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. धोंडीराम वाडकर यांनी इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका लिहिताना घ्यावयाची काळजी, एस. डी. मेंढेकर यांनी हिंदी विषयाचे, राम टेके यांनी गणित विषयाचे, अंजली शिंदे विज्ञान विषयाचे, सूर्यकांत सिताराम पुजारी यांनी मराठी विषयाचे, प्रताप यादव यांनी सामाजिक शास्त्रे- इतिहास विषय तर जी. व्ही. मरे यांनी भूगोल विषयाचे मार्गदर्शन केले. बारावी कला शाखेबाबत गणेश पाटील यांनी व बारावी शास्त्र शाखेबाबत प्रा. वाळवेकर यांनी मार्गदर्शन केले. बारावी वाणिज्य शाखेबाबत प्रा. काळे यांनी मार्गदर्शन केले. भरतगाववाडीचे मुख्याध्यापक भरत मोजर यांनी सूत्रसंचालन केले.





