Satara : किल्ले अजिंक्यतारा संवर्धनासाठी आठ कोटींचा निधी

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले अजिंक्यतारा या ऐतिहासिक स्थळासाठी सातारा नगरपालिकेने तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीमधून किल्ले अजिंक्यतारा परिसर संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे.
सातारा पालिकेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासक राजवट आहे. त्यामुळे विकास कामांसाठी असणाऱ्या तरतुदीबाबतची माहिती सर्वसामान्य सातारकरांना मिळत नाही. साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन तिरोडकर यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीवरून या बाबींची माहिती स्पष्ट झाली आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या अजिंक्यतारा स्मृतीस्थळ उद्यानासाठी पाच लाख तर अजिंक्यतारा किल्ला परिसर संवर्धन आणि इमारतींच्या मजबुतीकरणाकरता सातारा पालिकेने साडेसात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. अजिंक्यतारा किल्ला आपल्या कार्यक्षेत्रात आल्यानंतर सातारा पालिकेने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रकमेची तरतूद केली आहे.
या विकास कामांमध्ये अजिंक्यतारा किल्ला कमान उभारणे, मंगळाई परिसर ते दक्षिण दरवाजा रस्त्याचे प्रशस्तीकरण, दुतर्फा गटार ही कामे यापूर्वीच करण्यात आली आहेत. आता किल्ल्यावरील जीर्ण इमारतीचे मजबुतीकरण, छत्रपती शाहू महाराजांच्या राज सदरेला उर्जितावस्था देणे, ऐतिहासिक इमारतींना ऐतिहासिक पद्धतीचे बांधकाम करणे, याशिवाय शिवसृष्टी उभी करण्याकरता नवीन प्रस्ताव बनवणे अशा विविध कामांचा समावेश आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या स्मृतीस्थळ उद्यानामध्ये नवीन वृक्षांची लागवड, नवीन खेळणी बसवणे, येथे पाण्याची व्यवस्था करणे तसेच बागेची रंगरंगोटी करण्याकरता पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून हे कामही लवकरच सुरू करणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.
उपद्रवी प्रवृत्तींकडून विद्रुपीकरण…
किल्ले अजिंक्यताऱ्याला झळाळी मिळत असताना सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीही पाहायला मिळत आहेत. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिवे फोडणे, गटाराच्या संरक्षक जाळी काढून नेणे, गटारात माती ओतणे यांसारख्या प्रकारांचे सत्र थांबलेले नाही. मागील दोन महिन्यांत किल्ले परिसराला तब्बल पाच वेळा वणवा लावण्यात आला आहे. येथील वृक्षसंपदा, वन्यजीव व पर्यावरणाला त्याची झळ बसली आहे. त्यामुळे सातारा पालिकेने सुरक्षा यंत्रणा नेमून अशा प्रवृत्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे .





