Satara : म. फुलेंच्या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी

सातारा : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव कटगुण, ता. खटाव येथील स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये निधी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. म. फुले यांचे गाव शोभेल, असे काम करण्यासाठी आणखी निधी आणि या ठिकाणाला ‘ब’ वर्ग देण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कटगुण येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अंकुश गोरे, भाजप कार्यकारिणी सदस्या डॉ. प्रिया शिंदे, वडूजच्या नगराध्यक्ष सौ. रेश्मा बनसोडे, संजय करपे, अमृतराव काळोखे, प्रतापराव गोरे उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव गोरे आणि माझेही आडनाव गोरे आहे. महात्मा फुले आणि माझेही मूळ गाव कटगुण आहे. कटगुणच्या विकासासाठी आणि महात्मा फुलेंच्या स्मारकासाठी निधी देण्याच्या घोषणा आजपर्यंत अनेकांनी केल्या; परंतु प्रत्यक्षात काय झाले ते माहिती नाही. कारणदेखील माहिती नाही. येथील शासकीय कार्यक्रमांचे निमंत्रण मला देण्याचे टाळले जायचे. मात्र, आता तसे होणार नाही.
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो आहे. या खात्याच्या माध्यमातून कटगुणला ‘ब’ वर्ग देण्याबरोबरच महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जितकी जागा उपलब्ध आहे, त्या जागेला अनुसरुन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आम्ही नायगावचाही 142 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. कटगुणसाठी आणखी लागेल तितका निधी उपलब्ध करून देऊ.





