Satara : स्वारगेट अत्याचार प्रकरणी फास्टट्रॅक खटला चालवणार

सातारा : स्वारगेट बलात्कार प्रकरणी संशयिताची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात कठोर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाईल व गुन्हेगाराला कठोर शासन होईल यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
स्वारगेट बलात्कार प्रकरणी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना निंदनीय आहेत. स्वारगेट अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री नक्की कडक कारवाई करतील. राज्यात अशा घटना घडल्या त्या त्या वेळी पोलीस यंत्रणेने काम केले. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाईल गुन्हेगाराला कठोर शासन होईल, असे आश्वासन शिवेंद्रराजे यांनी दिले.
बेताल वक्तत्व्याबाबत
शासन कारवाई करेल
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर काय कारवाई करणार असे विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘महापुरुषांवर वादग्रस्त बोलून प्रसिद्धी मिळवायची ही काही जणांची फॅशन झाली आहे. कोणत्याही महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केले की त्याला प्रसिद्धी मिळते. चर्चेत नाव येण्यासाठी काही जण मुद्दाम वादग्रस्त वक्तव्य करतात. बऱ्याचदा इतिहासाची मोडतोड करून मांडणी करायची व त्याद्वारे राज्यात प्रसिद्धी मिळविण्याचे प्रकार वाढत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह कोणत्याही महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून राज्य शासनाने जनतेसमोर उदाहरण ठेवले पाहिजे. यासाठी कायदेशीर तरतूद करण्यासाठी राज्य शासन निश्चित प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले





