Satara : पोलीस अधिकार्यांवर कारवाईसाठी कोरेगावात उपोषण

कोरेगाव : वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयितांना अटक न करणार्या कोरेगावच्या पोलीस उपअधीक्षक आणि वाठार स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने कोरेगाव पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
त्या आधी पोलीस उपअधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल असतानादेखील संबंधित पोलीस अधिकार्यांनी संशयितांना अद्याप अटक केलेली नाही. या गुन्ह्यातील फिर्यादी कुटुंबातील एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, असे आंदोलकांनी सांगितले.
पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनावर संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष शंकर चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अश्विनी नवले, कार्याध्यक्ष विकास सरगडे, कोरेगाव तालुकाध्यक्ष अशोक अडागळे, प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत जाधव, सुषमा खरात व किरण खरात यांच्या सह्या आहेत.





