Satara : अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकर्यांचे हाल

कलेढोण : खटाव तालुक्यातील कलेढोण आणि गारुडी परिसरात कृषी पंपांना गेल्या काही दिवसांपासून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. हा प्रश्न सोडवण्याची मागणी महावितरणकडे अनेक वेळा करूनही, उपयोग होत नसल्याने शेतकरी कंपनीच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.
रब्बी हंगामात शेतात ज्वारी, हरभरा, गहू, मका, कांदा ही पिके चांगली बहरली आहेत, या भागातून जगभरात निर्यात होत असलेले द्राक्ष पीकदेखील जोमात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महावितरण कडून वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याने, हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी धोक्यात येण्याची शक्यता आहे. महावितरण कडून शेती पंपांना आठवड्यातून तीन दिवस दिवसा व तीन दिवस रात्री, दरदिवशी आठ तासांप्रमाणे वीजपुरवठा केला जातो.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून दर दोन ते तीन तासांनी वीजपुरवठा खंडित होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून स्थानिक कार्यालयाकडून एका फीडरवरील काही ट्रान्सफॉर्मर बंद ठेवून, केवळ चार तास वीज पुरवली जात आहे. असे करूनही वीजपुरवठा सुरळीत नसल्याची शेतकर्यांची तक्रार आहे.
बर्याचदा दिवसा सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने, आम्ही शेतकरी पाणी देण्यासाठी रात्री शेतात जात आहोत. अंधारात विषारी सर्प आणि इतर वन्यप्राण्यांमुळे जीविताला धोका आहे, तरीदेखील जीवावर उदार होऊन कडाक्याच्या थंडीत शेतीला पाणी द्यावे लागत आहे. शेतीसाठी दिवसातून आठऐवजी चार तास वीजपुरवठा सुरळीत व्हावा.
– दत्तात्रय घुटुकडे, शेतकरी, गारुडी.
फीडरवर जास्त भार होत असल्याने, अनेक भागातील डीपी बंद ठेवले जातात, असे बोगस कारण देऊन, वीजपुरवठा खंडित करणे, हा उपाय असू शकत नाही. शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा आठ तास वीजपुरवठा होण्याची अपेक्षा असताना, महावितरण कंपनीकडून शेतकर्यांची गळचेपी केली जात आहे. खंडित वीजपुरवठ्याला कंटाळून शेतकर्यांनी सोलर प्लँट बसवावेत, यासाठी हा खटाटोप आहे का, अशी चर्चा शेतकर्यांमध्ये आहे. खटाव सारख्या दुष्काळी भागातील शेतकर्यांना सोलर प्लँट बसवणे परवडणारे आहे का, हा प्रश्न आहे.
ट्रिपिंगमुळे वीजपुरवठा खंडित
ट्रिपिंगुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लोड दुसरीकडे शिफ्ट करण्याचे काम सुरू आहे. सोलर प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकर्यांचा प्रश्न नक्की सुटेल, असे वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सांगत आहेत.





