Satara Encroachment Drive: नगरपालिकेच्या कारवाईला अचानक ब्रेक; ‘या’ एका पत्रामुळे अतिक्रमण हटाव मोहीम रखडली
Satara Encroachment Drive: शाहूपुरी चौकाची मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी, गोडोलीत मात्र तांत्रिक अडचणींमुळे अतिक्रमण हटाव मोहिमेचा वेग मंदावला.

Satara Encroachment Drive – सातारा नगरपालिकेने समर्थ मंदिर ते बोगदा या मार्गावरील पक्की अतिक्रमणे कोणताही राजकीय हस्तक्षेप न जुमानता हटवून धडक कारवाई केल्यानंतर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेची जोरदार चर्चा झाली. मात्र, आता गोडोली परिसरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘ना हरकत’ पत्राची प्रतीक्षा करावी लागत असल्याने मोहिमेला तात्पुरता ब्रेक लागला आहे.
शहरातील शाहू चौक- केसरकर पेठ- राधिका रस्ता- राजपथ- खण आळी तसेच देवी चौक ते गोलबाग या मार्गांवरील पदपथ अतिक्रमणांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पोवई नाका- साईबाबा मंदिर- गोडोली जकात नाका- अजंठा चौक ते मराठा हॉटेल या मार्गावरील अतिक्रमणे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक रवी पवार यांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे गोडोलीतील अतिक्रमणे तातडीने हटविण्याची मागणी केली होती.
मात्र, संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने नगरपालिकेला कारवाईपूर्वी विभागाची परवानगी आवश्यक आहे. यासाठी नगरपालिकेच्या शहर विकास विभागाने १५ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नसल्याने कारवाई रखडली आहे. दरम्यान, पावसाळा, यंत्र सामग्रीची मर्यादित उपलब्धता,
अतिक्रमण हटावासाठी लागणारी साधने इतर कामांकडे वळविणे तसेच संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्यातील अडचणी यामुळे मोहिमेचा वेग मंदावल्याचेही सांगितले जात आहे. शाहूपुरी चौक परिसराची नुकतीच पाहणी करण्यात आली असून तेथील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कारवाई सुरू झालेली नाही. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी मात्र, ‘मोहीम थांबलेली नसून हा केवळ अल्पविराम आहे. आवश्यक परवानग्या, पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणेचा समन्वय पूर्ण होताच पुन्हा धडक कारवाई सुरू होईल,” असे स्पष्ट केले.





