प्रभात वृत्तसेवा सातारा – सुवर्णाताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सातारच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांना स्वगृही परत येण्याचे आवाहन भाजपच्या नेत्यांनी केले आहे. त्यांना स्वगृही बोलवणे म्हणजे भाजपच्या नेत्यांना आमच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे का? तसे त्यांनी गृहीत धरले आहे का? सुवर्णा पाटील यांना महाविकास आघाडीने न्याय दिला आहे. तुम्हाला निष्ठावान उमेदवाराची काळजी असती, तर तुम्ही त्यांना वेळीच थांबवले असते. आता आमच्या उमेदवाराची काळजी करायचे सोडून द्या, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला.सातारा जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. सातारा शहरासह इतर पालिकांमध्ये महाविकास आघाडीची कशी तयारी आहे, अशी विचारणा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आ. शशिकांत शिंदे यांना केली. त्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी आमच्या उमेदवाराची काळजी करणे सोडावे. सुवर्णाताई पाटील यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता शहराच्या विकासासाठी काम करणे महत्त्वाचे असल्याची भूमिका बोलून दाखवली आहे. त्यांची कामाविषयीची आत्मीयता आणि सातारच्या विकासाची केलेली मांडणी पाहून, सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. सुवर्णाताई पाटील यांना स्वगृही परतण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी केले होते. त्यासंदर्भात आ. शिंदे म्हणाले, त्या स्वगृही परत याव्यात, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. म्हणजे त्यांचा विजय पक्का आहे, असे त्यांनी गृहीत धरले आहे का? महाविकास आघाडीने त्यांना पुरेपूर न्याय दिला आहे. तुम्हाला तुमच्या निष्ठावानांची काळजी होती, तर तुम्ही त्यांना वेळीच थांबवले असते. प्रत्यक्षात अनेक निष्ठावंत भाजपच्या नेतृत्वापासून दूर गेले आहेत. सातार्यातील अनेक समस्यांविषयी लोक बोलत आहेत. अनेक धडाडीचे उमेदवार समोर आले होते. काहींनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. सातार्यात प्रस्थापितांची दहशत आहे, असे बोलणारे अनेक लोक आहेत. मात्र, लोकशाहीत निवडणूक समोरासमोर आणि अटीतटीची झाली पाहिजे. त्या दृष्टीने आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. जे आमच्याकडून भाजपमध्ये गेले आणि सत्तेमुळे बलाढ्य झाले, अशांना वगळून आणि उरलेल्यांना एकत्र घेऊन, अनेक विषयांवर आंदोलन करणे, प्रतिकुल राजकीय परिस्थितीत एकजुटीने संघर्ष करणे, लोकांना राजकीय वस्तुस्थितीची जाण करून देणे, ही कामे आता करावी लागणार आहेत.