Satara : जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडा गोडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश

वडूज : येथील माजी जिल्हा परिषद सदस्य, सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. एन. एस. उर्फ बंडा गोडसे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. ते यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार गटात कार्यरत होते. त्यांच्या भाजप प्रवेशाने खटाव तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
राणंद येथील कार्यक्रमात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, सौ. सोनिया गोरे, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, रविंद्र काळे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अक्षय थोरवे यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी ना. गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रा. गोडसे, श्री. थोरवे यांना सन्मानाची वागणूक देण्याची ग्वाही दिली.
प्रा. बंडा गोडसे म्हणाले, विधानसभा निवडणूकीत युतीचा धर्म म्हणून आपण ना. गोरे यांना त्यावेळी मनापासून सहकार्य केले. तेव्हापासून त्यांच्या कामाची पद्धत आपण जवळून अनुभवत आहे. त्यांच्या धडाडीमुळे खटाव, माण तालुक्यातील शेती पाण्यासह इतर अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत.
यापुढच्या काळात त्यांच्या नेतृत्वाशिवाय भागाला दुसरा पर्याय नाही. तसेच आपण ज्या ठिकाणी कार्यरत होतो त्या पक्षात वैयक्तिक हितासाठी येणाऱ्यांची भाऊगर्दी वाढली आहे. निवडणूक काळात महायुतीच्या विरोधात झटणारी माणसं सत्ता प्रवाहात सामील होणे चुकीचे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.





