सातारा जिल्हा बॅंकेची राज्यात विक्रमी कर्ज वसुली

सातारा -गेल्या वर्षीची पूर स्थिती आणि यंदा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. करोनाच्या विळख्याने शेती व्यवसायावरही अनिष्ट परिणाम झाला आहे.
अशा परिस्थितीतदेखील जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने केलेल्या आवाहनास आणि विकास सेवा संस्था, पंच कमिटी, सचिव व बॅंकेच्या वसुली यंत्रणेच्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने प्रामाणिकपणे पीक कर्जाची वेळेत परतफेड केली. परिणामी बॅंकेने आपली परंपरा कायम राखत यावर्षीही शेतीकर्जाची 97 टक्के वसुली करून राज्यात विक्रम केला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
याबाबतच्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध असलेली जिल्हा बॅंक 320 शाखा व 953 विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना निरंतर बॅंकिंग सुविधा पुरवित आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी-औद्योगिकीकरणाचे धोरण गतिमान करण्यासाठी बॅंकेने विविध योजना राबविल्या आहेत.
कृषी व कृषिपूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी सभासदांचे आर्थिक उत्पन्न व राहणीमान उंचावण्यासाठी बॅंक नेहमीच प्रयत्नशील आहे. बॅंकेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्याचा सातत्याने प्रयत्न केले आहेत. दुष्काळ, पूर स्थिती, करोनाची साथ अशा अडचणीच्या काळात बॅंकेने सामान्यांना सढळ हातांनी मदत केली आहे.
वसुली प्रोत्साहनासाठी व्याज परतावा योजना राबविणारी ही एकमेव बॅंक आहे. जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात 2020-21 साठी एकूण पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट 2200 कोटी रुपये आहे. त्यापैकी जिल्हा बॅंकेचे उद्दिष्ट 1300 कोटी रुपयांचे आहे. खरीप पिकासाठी 950 कोटी निश्चित केले असून दोन लाख 26 हजार 713 शेतकरी सभासदांना 1278 कोटींचे कर्जवाटप झाले आहे. उद्दिष्टाची 134 टक्के पूर्तता करून बॅंकेने उल्लेखनीय काम केले आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयानुसार पीक कर्ज परतफेडीस यंदा दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अद्याप पीककर्जाची परतफेड करू न शकल्याने नवीन पीककर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकरी सभासदांनी या मुदतीवाढीचा फायदा घेऊन कर्ज फेड करावी. त्यातून शासनाच्या व्याज परतावा व इतर योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.





