Satara : मेढा ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सुविधा सुरू

सातारा : दुर्गम व डोंगराळ जावळी तालुक्यात आरोग्याच्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यास नेहमी प्राधान्य देणार्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मेढा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालयाला पाच डायलिसिस मशीन्स उपलब्ध झाली असून, जावळी तालुक्यातील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरणार आहे. त्याबद्दल जावळीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागातही या आजाराचे असंख्य रुग्ण आढळत आहेत. मेढा ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सुविधा उपलब्ध नसल्याने, जावळी तालुक्यातील रुग्णांना खासगी रुग्णालये किंवा सातारा, पुणे, मुंबई आदी शहरांमधील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. तालुक्यातील रुग्णांना मेढा ग्रामीण रुग्णालयातच मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मेढा रुग्णालयासाठी अत्याधुनिक पाच मशीन्सचे डायलिसिस सुविधा केंद्र मंजूर झाले असून, रुग्णालयात ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
मेढा ग्रामीण रुग्णालयात एकाच वेळी पाच रुग्णांचे डायलिसिस करता येणार आहे. या सेवेमुळे जावळी तालुक्यातील रुग्णांना इतर ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही. किडनी विकाराच्या रुग्णांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरणार आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांवरील आर्थिक ताण कमी होऊन, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तालुक्यात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध आहे. आगामी काळात विविध आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्रालयातील आपल्या कक्षामधून, मुख्यमंत्री सहायता निधी विभागातून विविध आजारांच्या रुग्णांना आर्थिक साहाय्य मिळवून दिले जात आहे. मेढा येथे सुरू झालेल्या डायलिसिस सुविधेचा लाभ जावळी तालुक्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.





