Satara : आ. पडळकरांच्या उपस्थितीत धनगर समाजाची उद्या बैठक

सातारा : पुण्यात होणाऱ्या ‘पन्नास हजार ढोलांचा रुद्रनाद’ या उपक्रमाच्या नियोजनासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सातारा येथे धनगर समाजबांधवांची रविवारी दि. २० रोजी सकाळी साडेदहा वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती माजी सनदी अधिकारी टी. आर. गारळे व हनुमंतराव चौरे (तात्या) यांनी दिली.
लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘पन्नास हजार ढोलांचा रुद्रनाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
धनगर समाजाची लोककला गजीनृत्य, ढोलवादन, ओवी जतन करणे व वृद्धिंगत करणे आवश्यक असल्याने ५० हजार ढोल वादनाचा विश्वविक्रम करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ढोल वादक व गजीनृत्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
त्यासाठी जिल्हानिहाय बैठका तात्काळ होऊन जिल्ह्यातील राजकारणविरहित सर्व संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रुपरेषा ठरवली जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी सातारा जिल्ह्यातील समाज बांधवांची बैठक रविवारी दि. 20 रोजी सकाळी १०.३० वाजता गुरुशिल्प बिल्डिंगमध्ये (बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा) आयोजित केली आहे.
या बैठकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर मार्गदर्शन करणार आहेत, या बैठकीला सातारा शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन टी. आर. गारळे व हनुमंतराव चौरे (तात्या) यांनी केले आहे.





