Satara : ना. गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाईची मागणी

वडूज : ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणीवपूर्वक चिखलफेक करत असून त्यांना बदनाम करण्याचे काम करत आहे. त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वडूजचे पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ना. गोरे यांच्या विरुद्ध तिने २०१६ मध्ये कोर्टामध्ये केस केली होती. परंतु, कोर्टाने जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे, असे असूनही आठ वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने ना. गोरे यांची बदनामी करण्याचे काम सुरू केले आहे. ना. गोरे यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी महिलांना सन्मानाची वागणूक मिळत असते, असे असताना एका चांगल्या व्यक्तीची नाहक बदनाम होत असेल तर ते समाजासाठी घातक आहे.
या महिलेवर आणि तिला पाठिंबा देणाऱ्या किंवा तिला हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकारी महिलांनी केली. यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वृषाली विक्रम रोमण, नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे, राधिका गिरीश गोडसे, शीतल अमोल गोडसे, मनीषा रवींद्र काळे, किशोरी अजित पाटील, सौ. सुरेखा जयवंत पाटील, सौ. रेखा अनिल माळी, सौ. वैशाली लालासाहेब माने, सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे, सौ. रेखा अमर लोहार, रेश्मा रवींद्र तनावडे, सौ. शोभा तानाजी वायदंडे, सौ. रोशना संजय गोडसे आदी महिला उपस्थित होत्या.





