Satara DCC Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोडी! ५ ऑक्टोबरला कुणाचा अर्ज बाद होणार? महायुतीचा ठरला ‘हा’ प्लॅन
Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची रणधुमाळी; ५ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी, कोणाचे अर्ज वैध ठरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष.

Satara DCC Bank Election- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार असून कोणाचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे अर्ज बाद होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. छाननीनंतर महायुतीतील प्रमुख नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून जिल्हा कॅटेगरीतील दहा जागांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
महायुती म्हणूनच जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला असला, तरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाचा कोणताही निश्चित फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. प्रत्येक पक्षाकडे असलेल्या ठरावांची संख्या लक्षात घेऊन जिल्हा कॅटेगरीतील दहा जागांचे वाटप करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच दिली. महाविकास आघाडीने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोरही आव्हान निर्माण झाले आहे.
सुमारे 95 टक्के मतदान महायुतीच्या बाजूने असल्याचा दावा केला जात असतानाही विकास सोसायटी गटातील निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनाच अंतर्गत लढतीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अकरा तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या गटातील जागांवर स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणे आहेत.
त्यामुळे या जागांवर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला माघार घेण्याच्या सूचना देता येणार नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. तालुकानिहाय विकास सोसायटी गटात निवडणूक होण्याची शक्यता कायम आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांकडे किती ठराव आहेत, याची आकडेवारी गोळा केली जात आहे. संबंधित नेत्यांकडून ठरावांची माहिती घेण्यात येत असून त्याआधारे जिल्हा कॅटेगरीतील दहा जागांचे वाटप निश्चित केले जाणार आहे.
5 ऑक्टोबरच्या छाननीनंतर महायुतीचे नेते पुन्हा एकत्र बसून ठरावांच्या आकडेवारीवर चर्चा करतील आणि त्यानंतर जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील चारही मंत्री, खासदार आणि महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकत्र आहेत. जिल्हा कॅटेगरीतील दहा जागांचा तिढा जिल्हास्तरावरच सोडवायचा आहे, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.






