Satara Civil Hospital : जिल्हा रुग्णालयाची सेवाच ‘सलाईन’वर! १०६ पदे रिक्त; रुग्ण कोणाच्या भरवशावर?
Satara Civil Hospital : फिटनेस सर्टिफिकेटपासून औषध खरेदीपर्यंत सगळंच रखडलं; जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय गोंधळाचा पंचनामा.

Satara Civil Hospital – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेची परवड दिवसेंदिवस वाढत असून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर चालणारा कारभार आणि तब्बल 106 रिक्त पदांचा बोजा यामुळे संपूर्ण यंत्रणा अक्षरशः ताणली गेली आहे. वाढती रुग्णसंख्या आणि अपुरी मनुष्यबळ यामुळे रुग्णसेवेचा दर्जा घसरत असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा तात्पुरता कार्यभार डॉ. राहुल जाधव यांच्याकडे आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालय असा 26 वर्षांचा अनुभव असला तरी पूर्णवेळ नेतृत्वाऐवजी ‘प्रभारी’ स्वरुपामुळे निर्णयक्षमतेवर मर्यादा येत असल्याची चर्चा आहे. प्रशासकीय पातळीवरही डॉ. स्मिता लोंढे या प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे धोरणात्मक निर्णय आणि दैनंदिन कामकाज यात समन्वयाचा अभाव जाणवत आहे.
त्यात रुग्णालयातील विविध संवर्गातील पदांची स्थिती गंभीर आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी (वर्ग 1) पदे 20 मंजूर असताना केवळ 4 भरलेली असून 16 रिक्त आहेत. वर्ग 2 मध्ये 31 पैकी 21 पदे रिक्त आहेत. वर्ग 3 मध्ये 67 पैकी 9, तर वर्ग 4 मध्ये 167 पैकी 21 पदे रिक्त आहेत. सुश्रुषा (नर्सिंग) विभागातही 147 पैकी 39 पदे रिक्त आहेत. एकूण मिळून 106 पदे रिक्त असल्याने सेवा देताना प्रचंड ताण निर्माण होत आहे.
वाडत्या रुग्णसंख्येला कमी पडते सेवा
दररोज सुमारे 1200 ते 1500 रुग्ण उपचारासाठी येत असल्याने रुग्णालयावर मोठा भार आहे. सुविधा उपलब्ध असल्या तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांशी संवाद, वेळेवर सेवा आणि सौजन्यपूर्ण वागणूक यांचा अभाव जाणवत आहे. परिणामी, ‘सेवा आहे पण समाधान नाही’ अशी भावना रुग्णांमध्ये वाढीस लागली आहे.
वादग्रस्त घटनांनी प्रतिमा मलिन
गेल्या काही काळात घडलेल्या घटनांनी रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विजापूर येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणासह नवजात मृत्यू आणि एका महिन्यात दोन वेळा मृतदेह बदलण्याच्या घटनांनी प्रशासनाची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात आणली. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज तर्फे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांना निलंबित करण्यात आले आहे.
रखडले प्रशासकीय निर्णय
प्रभारी कारभारामुळे महत्त्वाची कामे प्रलंबित राहिल्याचेही समोर आले आहे. फिटनेस प्रमाणपत्र, औषधे व लॅब साहित्य खरेदी, नवीन रुग्ण नोंदणी, रुग्णालय नूतनीकरण परवाना यांसारख्या अत्यावश्यक बाबींमध्ये विलंब होत आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न
सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असतानाही जिल्हा रुग्णालयाची अवस्था ‘सलाइनवर’ असल्याची टीका होत आहे. रुग्ण सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः लक्ष घालून कारभार सुधारावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






