सातारा : भरतगाव सेवा रस्त्यावरुन धावू लागल्या बसेस

नागठाणे – महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणारी वाहने आणि त्यातच प्रवाशांची चढउतार करण्यासाठी थांबणारी एस. टी. बस असा प्रकार सेवारस्ता बंद असल्याने भरतगाव, ता. सातारा येथे सुरु होता. हा प्रवास धोकादायक असल्याने याबाबत नागरिकांनी सेवारस्त्यावरुन बसेस नेण्याची मागणी केली होती. यावर दि. 22 रोजीच्या दै. प्रभातच्या अंकात “एस. टी. धावते महामार्गावर, प्रवासी मात्र वाऱ्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्घ केले होते. या वृत्ताची एस. टी. प्रशासनाने दखल घेतली. त्यामुळे पाहणी केल्यानंतर सेवारस्त्याने बसेस धावू लागल्याने भरतगाववाडीचे नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थ “दै. प्रभात’ला धन्यवाद देत आहेत.

अधिक माहिती अशी, नवीन तिसऱ्या मार्गीकेचे काम व भारत पेट्रोलियमच्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे भरतगावला जाणारा सेवारस्ता बंद होता. यामुळे भरतगावच्या विद्यार्थी, नागरिकांना बससाठी महार्गावर यावे लागत होते. वेगाने वाहतूक असलेल्या महामार्गावर एस. टी. बससाठी थांबणे तसेच चढउतार करणे धोकादायक होते तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून दै. प्रभातच्या प्रतिनिधींनी सातारा आगाराचे प्रमुख आर. एम. शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.
तर ग्रामस्थानी एस. टी. ची प्रवासी वाहतुक सेवा रस्त्याने न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. “दै. प्रभात’चे वृत्त प्रसिद्घ झाल्यानंतर हायवे प्रशासनाचे अजित घारे यांनीही प्रत्यक्ष येऊन पाहणी केली. नवीन तिसऱ्या मार्गीकेचे काम व भारत पेट्रोलियमच्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे भरतगावला जाणारा सेवारस्ता बंद होता. तो हायवे प्रशासनाने पुन्हा तयार करून दिला.
त्यानंतर एस. टी. प्रशासनाचे प्रतिनिधी महेश देवलक, भरतगावचे पोलीस पाटील प्रताप शेलार, अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक अशोक पाटील व दै. प्रभातच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भरतगाव येथे सेवारस्त्याची पाहणी केली. सेवारस्ता हा एस. टी. बसेस साठी योग्य असल्याची खात्री झाल्याने अखेर सेवा रस्त्याने बससेवा सुरू झाली आहे.





