Satara : लातूरसाठी ६१६.९७ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर करा

सातारा : लातूर जिल्ह्यासाठी वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५- २६ करीता कमाल नियतव्यय मर्यादेतील आराखडा ३६१.२६ कोटींचा आहे. जिल्ह्यात विविध विकासकामांसह जनहिताच्या योजना राबवण्यासाठी या आराखड्यात २५५.७१ कोटी अतिरिक्त वाढ द्यावी आणि लातूर जिल्ह्यासाठी ६१६.९७ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. लातूर जिल्ह्यात गाव तेथे स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे लातूर जिल्ह्याच्या प्रारूप आराखडा मंजुरीबाबत झालेल्या बैठकीत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. बैठकीला अर्थ विभागाचे सर्व अधिकारी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
वाढीव अतिरिक्त निधीची मागणी जनहिताच्या विविध बाबींसाठी करण्यात आली असून महिलांसाठी व बालकांसाठी स्वतंत्र बालभवन इमारत बांधणे, बचतगटांच्या वस्तूंसाठी विक्री केंद्र उभारणे, गाव तेथे स्मशानभूमी व तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, ग्रामपंचायत क्षेत्रात सौरअभ्यासिका कार्यक्रम राबवणे, पाणीपुरवठा योजनांना स्वतंत्र रोहित्र बसवणे, सर्व शासकीय इमारतींवर सोलर यंत्रणा बसवणे, जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये औषधे व यंत्रसामुग्री खरेदी करणे, एमआरआय सुविधा उपलब्ध करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शौचालय सुविधा, शाळेत मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, शाळेत भौतिक सुविधा, मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही, महिलांसाठी शहरात सार्वजनिक शौचालय बांधणे अशा विविध कामांसाठी अतिरिक्त वाढीव निधीची मागणी करण्यात आली असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
गंजगोलाईच्या सुशोभिकरणाची मागणी
गंजगोलाई ही वास्तू लातूरची एक जुनी ऐतिहासिक ओळख आहे. एक पर्यटनस्थळ म्हणून नवे आकर्षण व्हावे यासाठी गंजगोलाईचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे, यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणीही ना. शिवेंद्रसिंहराजेंनी ना. पवार यांच्याकडे केली. ना. पवार म्हणाले, आपण कधीही शिवेंद्रसिंहराजे यांना निधीची कमतरता भासू दिली नाही. आता ते लातूरचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे लातूरला आपण झुकते माप देणार असून सर्व बाबींचे परिपूर्ण प्रस्ताव तयात करा. मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू.





