Satara : प्रतिसरकार क्रांतीस्तंभ शिल्प गवताच्या विळख्यात

कृष्णानगर : खा. शरद पवार यांनी नुकतेच सातारा येथील ज्या हजेरी माळावरील प्रतिसरकार स्मारकातील सभागृहासाठी २५ लाख रुपये खासदार निधीतून मंजूर केले आहेत. मात्र सध्या हजेरी माळ व तेथील प्रतिसरकार क्रांतीस्तंभ शिल्प पूर्णपणे वाळक्या गवताने वेढले असून प्रशासन याबाबतीत ढिम्म आहे. गवताच्या विळख्यात अडकलेला प्रतिसरकार क्रांतीस्तंभ स्वच्छतेचे स्वातंत्र्य मागत आहे.
स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांना क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकार ने सळो की पळो करून सोडले होते १९४२ च्या चले जाओ स्वातंत्र संग्रामच्या काळात प्रति सरकारने उल्लेखनीय कामगिरी पार पाडली होती याच लढयाच्या सुवर्ण महोत्सव दिनानिमित्त तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी भारतात पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात सातारा या ठिकाणी प्रतिसरकार स्मारकासाठी एक कोटी रुपये व भूखंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
याकामी तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी भूखंड व नियोजन समितीच्या माध्यमातून तत्कालीन जिल्हाधिकारी रामस्वामी यांनी निधी उपलब्ध करून या निधीमधून सदर जागेचे कंपाऊंड व प्रतिसरकार क्रांतीस्तंभ शिल्प उभारण्यात आले.
प्रतिसरकार क्रांतीस्तंभ शिल्प व संपूर्ण हजेरी माळ गवताने वेढलेला असून हे गवत पूर्णपणे वाळलेले असल्याने वणवा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर येथील मेन गेटची उंची कमी असल्याने व रात्री या ठिकाणी उभ्या असलेल्या खाजगी बसेसच्या आडून या जागेचा वापर मद्यपींकडून किंवा अनैतिक व्यवसायासाठी केला जावू शकतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या उल्लेखनीय कार्याची नोंद केंद्र सरकारने घेतली. परंतु, त्यांच्याच कर्मभूमीत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे स्मारक गवताने धुळखात पडले आहे.





