Satara: वर्षानुवर्षे चर्चेत असलेले सातारा शहरातील वाहतूक, अनियमित्त पाणी, खड्डेमुक्त रस्ते, अनियमित घंटागाड्या, अतिक्रमणे, अस्वच्छ गटारे अशा समान प्रश्नांवर आज पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवारांच्या एकत्रित उपस्थितीदरम्यान चर्चा करण्यात आली आणि प्रत्येक उमेदवाराने सकारात्मक उत्तरे देत प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. निमित्त होते बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित प्रेसिडेन्शिअल डिबेटचे. विकसित देशांत निवडणुकीपूर्वी ‘प्रेसिडेंशियल डिबेट’ होते त्याच पद्धतीने साताऱ्यात बालाजी ट्रस्टच्यावतीने नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवारांना एकाच व्यासपीठावर घेऊन विकसित सातारा या संकल्पनेबद्दलचे प्रश्न विचारले. साताऱ्याचा शाश्वत विकास आणि विकसित सातारा हाच आमचा एकमेव अजेंडा राहील, हा विश्वास नगराध्यक्षपदासाठीच्या सर्व नऊ उमेदवारांनी व्यक्त केला. उपक्रमाला प्रत्येक क्षेत्रांतील निमंत्रित हजर होते. भूतकाळाबाबत न बोलता संघटित विकासाबाबत चर्चा करताना बेरोजगारी, रस्ते, गटारे, पाणी, झोपडपट्टी अशा मूलभूत गरजांच्या पुढे जाऊन पाच वर्षानंतरचा सातारा कसा असेल याविषयी चर्चेचा प्रयत्न यावेळी झाला. नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार भाजपचे अमोल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुवर्णा पाटील, अपक्ष शरद काटकर, गणेश भिसे, रवींद्र भणगे, सागर भिसे, सनी (सुनील) काटे, सुधीर विसापुरे, अभिजित बिचकुले उपस्थित होते. तर बालाजी ट्रस्टकडून अध्यक्ष राजेंद्र चोरगे, संजय कदम, जगदीश खंडेलवाल, अंबाजी देसाई, उदय गुजर, नितीन माने, दीपक मेथा, संजय निकम, हरिदास साळुंखे, जयदीप शिंदे, संतोष शेंडे, श्रावण पाटील या सर्वांनी मान्यवरांचे स्वागत केले. सर्व उमेदवारांना प्रश्न विचारण्याचा प्रारंभ करताना राजेंद्र चोरगे यांनी साताऱ्याचे क्षेत्रफळ किती, पाण्याची नक्की गरज किती, शहरात रोज कचरा किती जमा होतो असेल असे प्रश्न विचारले. दहांपैकी केवळ एका प्रश्नाचे उमेदवारांना उत्तर देता आले. अजिंक्यतारा किल्ल्याचा विकास आणि पर्यटनवाढीसाठी सर्वपक्षीय संघटित प्रयत्न करणे सर्वांनी मान्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झालेली शाळा व त्यांचा रहिवास असलेल्या घराला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याच्या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे सागर भिसे यांनी सांगितले. उपक्रम सुरु झाल्यावर सुमारे दोन तासांनंतर निमंत्रितांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेकांना प्रश्न विचारता आले नाहीत. मात्र, सर्वपक्षीय आणि सर्व उमेदवारांचे पुढील पाच वर्षांसाठी ‘संकल्प विकसित साताऱ्याचा’ हे ब्रीद वाक्य कायम असेल यावर सर्व नऊ उमेदवारांनी सर्वांसमोर मान्यता दिली. सुरवातीचे प्रश्न दीपक प्रभावळकर यांनी विचारले. या उपक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका चित्रा भिसे यांनी केले. राजकीय हस्तक्षेपाबद्दल मौन या उपक्रमाला काही महिलाही उपस्थित होत्या. त्यापैकी सौ. बीना शहा यांनाच फक्त प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. मिरवणुकांमधील डॉल्बी किंवा लेझर लाइट किंवा वाढदिवस साजरे होताना दिसतात. त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित असला तरी त्याला हरकत घेत नाही तसेच महिला दुचाकीवरुन जाताना एखादा झासा देऊन जातो, त्यावेळी त्याचा आविर्भाव वेगळाच असतो. अशा गोष्टींसाठी कोणाचा तरी राजकीय वरदहस्त असतो. असा राजकीय हस्तक्षेप बंद होण्यासाठी पुढाकार घेण्याबाबतचा प्रश्न त्यांनी विचारला. मात्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी याबाबत मौन बाळगणेच पसंत केले. महत्वाच्या प्रश्नाला बगल… सातारा शहराजवळ आयटी पार्क मंजूर झाले आहे. त्यासाठी अनेक तंत्रज्ञ, अभियंते येणार.त्याचा एकूणचा ताण शहरावर येणार. त्याअनुषंगाने शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व इतर इन्फ्रास्ट्रक्चरबाबत काही नियोजन आहे का, असा प्रश्न उद्योजक धैर्यशील भोसले यांनी विचारला. मात्र, त्यावरही कोणतेही समाधानकारक उत्तर त्यांना मिळू शकले नाही. तसेच तत्कालिन जिल्हाधिकारी एम. रामास्वामी यांनी टीसीएस कंपनीच्या सहकार्याने केलेल्या शहर विकासाच्या आराखड्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर भूतकाळातील काही विचारु नये, असे सोयीस्कर उत्तर मिळाले. एवढेच नव्हे तर एमआयडीसी नगरपालिकेच्या क्षेत्रात येत नाही, असेही उत्तर मिळाले. वचननाम्यावर केल्या सह्या उपक्रम केवळ व्यासपीठापुरता नव्हता तर पुढील पाच वर्षांसाठी तुम्ही काय काय वचन दिली आहेत आणि काय काय सूचना स्वीकारल्या आहेत. नगराध्यक्ष झाल्यावर दिलेल्या आश्वासनांवर कटीबद्ध राहण्याचा वचननामाही त्यांनी लिहून दिला. यासाठी शासकीय स्तरावरचे वचननाम्याचे दस्त करून घेण्यात आले होते. या दस्तावर दोन साक्षीदारांच्या सहीनिशी नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवारांनी सह्या केल्या.