Satara : आरटीईअंतर्गत प्रवेशाची आज सोडत

सातारा : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईची २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी (दि. १०) दुपारी एक वाजता होणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ९२८ जागांसाठी तब्बल चार हजार ७८० जणांचे अर्ज आहेत, अशी माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी एक लाख नऊ हजार १११ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी १४ ते २७ जानेवारीची पहिली मुदत दिली होती.
२७ जानेवारी ते दोन फेब्रुवारी अशी दुसरी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ न देता सोमवारी लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यातून तीन लाख पाच हजार ९५७ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील २२१ शाळांतील १९२८ जागांसाठी मोफत प्रवेशासाठी आरटीईअंतर्गत तब्बल चार हजार ७८० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.
सोमवारी होणाऱ्या सोडतीत कोणाला प्रवेशाची लॉटरी लागणार याची उत्सुकता पालकांत आहे. त्यानंतर संबंधित संकेतस्थळावर प्रवेश देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. या सोडतीनंतर साधारण १५ फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.





