सातारा – अठरा वर्षांवरील नागरिकांचे मोफत करोना लसीकरण वेगाने आणि प्रभावीपणे सुरू करण्यासाठी सातारा शहर व जिल्ह्यात जादा लसीकरण केंद्रे सुरू करण्याबाबचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य विभागाला सादर करण्यात आल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना 1 मेपासून मोफत लस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. लोकसंख्येचा विचार करता सातारा शहरात सदरबझार, दगडी शाळा आणि शाहूपुरी ग्रामपंचायत इमारत या ठिकाणी नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायती व मोठया ग्रामपंचायतींच्या अधिकार क्षेत्रात नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावित केले आहे.
नागरिकांना सुकर होईल, अशी लसीकरणाची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच करण्यात येईल. सातारा शहरात सुरुवातीपासून पालिकेच्या माध्यमातून कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गोडोलीतील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज नागरी आरोग्य केंद्रामध्ये सातारा शहर व उपनगरातील सरासरी सहाशे नागरिकांना मोफत लस दिली जात आहे. या केंद्रांवर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तातडीच्या वैद्यकीय प्रथमोपचाराची सोय करण्यात आली आहे.