सातारा – फिरायला गेलेल्या महिलेच्या दागिन्यावर मारला डल्ला

वाठार स्टेशन – सर्कलवाडी ता. कोरेगाव येथील सकाळी फिरायला गेलेल्या महिलेचे एक तोळा वजनाचे सोन्याच्या चैन मधील अर्धवट तुटलेले मिनी गंठण काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सर्कलवाडी प्रमिला अनिल बागडे (वय ५२) या शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गावापासून जवळच भारत विद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी फिरायला गेल्या होत्या. फिरून माघारी घरी येत असताना भारत विद्या मंदिर हायस्कूल समोर दुचाकीवरून दोघेजण आले. त्यापैकी पाठीमागे बसलेल्या अज्ञात व्यक्तीने बागडे यांना लाथ मारून खाली पाडले व गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी चोरट्यास प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत मंगळसूत्रापैकी एक तोळे वजनाची चेन चोरट्याच्या हातात तुटून गेली पैकी चेनचा काही भाग दोन वाट्या व एकूण पाच सोन्याचे मनी असे हातात राहिले. त्यावेळी बचावासाठी बागडे यांनी आरडाओरडा केला. असता यातील एका व्यक्तीने त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून जबरदस्तीने चेन खेचून निघून गेला. घटनेची फिर्याद प्रमिला बागडे यांनी वाठार पोलिसात दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव करत आहेत.





