Satara : स्वरुपखानवाडीच्या महिलेने ३५ दिवसांत बांधले घरकूल

सातारा : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा 2) अंतर्गत सातारा जिल्ह्यास मंजूर उद्दिष्टांनुसार पात्र लाभार्थ्यांना जलद गतीने घरकुले मंजूर केली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३७ हजार ३८७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून २८ हजार ७२४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत केला आहे. त्यापैकी २७४ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत. माण तालुक्यातील स्वरुपखानवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील श्रीमती संगीता उत्तम कदम यांनी केवळ ३५ दिवसांत घरकुल बांधून पूर्ण केले आहे. हा जिल्ह्यातील एक विक्रम ठरला आहे. यापूर्वी २०१६ -१७ मध्ये माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील श्रीमती शालन बबन निंबाळकर यांनी ६१ दिवसांत घरकुल बांधण्याचा उच्चांक प्रस्थापित केला होता.
भूमिहिन बेघर लाभार्थी कुटुंबांना शासकीय जागा, गायरान मधील सार्वजनिक उपक्रमांतर्गत जागा, ग्रामपंचायत मालकीच्या जागा, पंडीत दिन दयाळ उपाध्याय घरकुल करीता जागा खरेदी अर्थ सहाय योजना अंतर्गत कमाल अर्धा गुंठा जागा (खरेदीसाठी कमाल एक लाख मर्यादेत-शासकीय दर) इत्यादी माध्यातून जागा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत करण्याची कार्यवाही सुरु आहे. या कामात महसुल विभाग पूर्णपणे सक्रिय आहे. प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत १३२ आदिवासी कातकरी कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी शासकीय जागा उपल्बध करुन देण्यात आली असून त्यांची या जागेत घरकुले मंजूर केलेली आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी घरकुलांच्या मंजुरीसाठी व कामे गतीने पूर्ण होण्यासाठी आढावा घेवून सुचना दिल्या आहेत. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांमार्फत गतीने कार्यवाही सुरु आहे. जी कुटुंबे घरकुलासाठी पात्र आहेत परंतु त्यांची नावे प्रतिक्षा यादीत नाहीत अशा कुटुंबांचे घरकुलाच्या लाभासाठी एप्रिल 2025 मध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून आवास प्लस अॅपव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ ग्रामीण भागातील गरजू लाभार्थींनी घेवून सर्वेक्षकांना अचूक माहिती उपलब्ध करुन दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका निहाय घरकुल मंजुरी व पूर्ण झालेल्या घरकुलांची सद्यस्थिती
तालुका मंजूरी पूर्ण घरकुले
जावली 1800 8
कराड 5031 98
खंडाळा 1435 20
खटाव 3984 10
कोरेगांव 3378 28
महाबळेश्वर 889 31
माण 3125 24
पाटण 7822 21
फलटण 3369 23
सातारा 4756 9
वाई 1798 2
एकूण 37387 274
सातारा जिल्ह्यात घरकुल बांधणी जलदगतीने सुरू आहे. लाभार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून, प्रशासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयाने हे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. घरकुलांचे हप्ते वेळेत लाभार्थींच्या खात्यावर जमा होत असून लाभार्थींनी चांगल्या दर्जाचे काम करुन ते वेळेत पूर्ण करावे.
– याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी





