Satara : कोरेगावला ॲग्री स्टॅक योजनेत ३२४५ शेतकऱ्यांनी केली नोंदणी

कोरेगाव : तालुक्यात अग्रिस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून कोरेगाव येथील दोन दिवसीय नोंदणी शिबिरामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी आणि राज्य व केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आयोजित नोंदणी शिबिराची सांगता शनिवारी सायंकाळी सहा वाजता झाली. शेतकऱ्यांनी ग्राममहसूल अधिकारी, ग्राम सहाय्यक, कृषी सहायक, ग्रामपंचायत अधिकारी, विकास सोसायटीचे सचिव यांच्यामार्फत अथवा एकात्मिक नागरिक सुविधा केंद्र तथा सीएससी केंद्रामार्फत नोंदणी करावी किंवा स्वतःच्या मोबाइलद्वारेही नोंदणी करू शकतात, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले.
भाजप तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, दीपक फाळके, रोहन जाधव, ग्राममहसूल अधिकारी किरण पवार, ग्राम महसूल सहाय्यक सुरज सरगडे, संतोष बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीच्या आजी माजी नगरसेवकांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या नोंदणी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव, सहाय्यक निबंधक प्रीती काळे यांच्यासह प्रशासकीय खातेप्रमुखांनी नोंदणी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेऊन आपल्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी या शिबिरासाठी तैनात केले. या अधिकारी, कर्मचारी, सेतू केंद्र चालक, कॉम्प्युटर ऑपरेटर यांचेही आमदार महेश शिंदे यांनी आभार मानले.
विक्रमी ३२४५ शेतकऱ्यांनी केली नोंदणी
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकही शेतकरी राज्य व केंद्र सरकारच्या योजने पासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता आमदार महेश शिंदे यांनी घेतली आहे. नोंदणी करण्यात शेतकऱ्यांना येत असलेली अडचण लक्षात घेऊन कोरेगावात शासकीय विश्रामगृहाच्या आवारात नोंदणी शिबिर घेतलेल्या शिबिरामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ५१५ हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. तर ॲग्री स्टॅकसाठी २७३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली.





