Satara : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची १ हजार ८५६ कामे

सातारा : जिल्ह्यातील ६७० ग्रामपंचायतींमार्फत रोजगार हमी योजनेची १ हजार ८५६ कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. या कामांवर ९ हजार २६४ मजूर काम करत आहेत. सर्वात जास्त कामे घरकुलांची असून ती सर्वच तालुक्यात सुरु आहेत. आगामी दोन महिन्यांत आणखी कामे वाढण्याची शक्यता आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वाटचाल गावातच काम आणि गावातच दाम यानुसार सुरू आहे. योजनेची संपूर्ण कार्यप्रणाली संगणकीकृत असून हजेरीदेखील ऑनलाइन होते. यामुळे योजनेतील बोगसगिरीला चाप लागण्यास मदत झाली आहे. कामावरील मजुरीचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील गावांत रोजगार हमी योजनेच्या कामांना गती मिळाली आहे.
कृषी विभागामार्फत शेततळी व फळबाग लागवडीची ५ कामे सुरू असून त्यांवर १ हजार २ मजूर काम करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची ७ कामे सुरू असून २ हजार ४५४ मजूर काम करत आहेत. सामाजिक वनीकरण विभागामार्फत एका ठिकाणी रोपवाटिकेचे काम सुरू असून ६० मजूर काम करत आहेत. रेशीम उद्योग विभागामार्फत ५८ ठिकाणी कामे सुरू असून १ हजार ७४६ कामे सुरू आहेत.
ग्रामपंचायतीमार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर, वृक्षलागवड, शिलाफलक, बांबू लागवड, जनावरांचा गोठा, जलतारा, रस्ते, शेततळे, शोषखड्डे, घरकुल , शाळा संरक्षक भिंत आदी कामे केली जात आहेत. घरकुलाची १ हजार ५८९ कामे सुरू असून ४२ हजार ४७८ मजूर काम करत आहेत. सिंचन विहीरीच्या ६४ कामावर ५ हजार १९६ मजूर, वृक्षलागवडीच्या ५१ कामावर ४१४ मजूर, जलताराच्या ३८ कामावर ८४६ मजूर, बांबू लागवडीच्या ३२ कामावर ६४८ मजूर काम करत आहेत.
माण तालुक्यात सर्वाधिक ४११ कामे
ग्रामपंचायत पातळीवर रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. त्यानुसार जावळी २४१, कराड १३०, खंडाळा ६४, खटाव १५२, कोरेगाव १०६, महाबळेश्वर ४६, माण ४११, पाटण २३८, फलटण १९६, सातारा १९८, वाई तालुक्यात ७४ कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक कामे माण तालुक्यात सुरु आहेत.





