Satara : जिल्ह्यातील १८ गुरुजी होणार विस्तार अधिकारी

सातारा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या १८ रिक्त जागांची पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षकांमधून ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील पात्र १२ शिक्षक आता विस्तार अधिकारी होणार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया सन 2024-25 मध्ये राबवलेली होती.
बारा वर्षानंतर पहिल्यांदा ३६ पैकी ३६ पदे भरलेली होती. त्यानंतर आज अखेर रिक्त झालेल्या पदांवर विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली आहे सद्यस्थितीला ३६ विस्तार अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून १८ विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. सातारा जिल्हा परिषदेमध्ये गुणवत्ता पूर्ण उपक्रम राबवल्यामुळे पर्यवेक्षी यंत्रणा मजबूत करण्याकडे जिल्हा परिषदेचा भर आहे. त्याअनुषंगाने १८ रिक्त विस्तार अधिकारी पदे भरण्याचा अनुषंगाने शिक्षणाधिकारी यांनी पात्र विस्तार अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे.
या यादीतील एकास दीड या प्रमाणात यादी अंतिम करण्यात येणार आहे. ही यादी पदोन्नती समिती समोर ठेवून त्यास समितीची मान्यता घेण्यात येणार असून त्यानंतर लगेचच ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये पदोन्नती प्रक्रियेवर भर दिलेला असून त्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापूर्वी केंद्रप्रमुखांची पदोन्नतीची पदे शंभर टक्के भरलेली होती. तसेच मुख्याध्यापकांची पदे यापूर्वी भरलेली होती.
सेवक संच मान्यता २०२४ -२५ सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांची अंतिम झाल्यानंतर मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया करण्यात येणार आहे. सद्यस्थितीला सर्व शाळांच्या सेवक संच निश्चिती अंतिम झालेल्या नाहीत. विस्तार अधिकारी वर्ग तीन श्रेणी २ ची दहा पदे पदोन्नतीसाठी मंजूर असून त्यापैकी पाच विस्तार अधिकारी पदे कार्यरत आहेत मात्र उर्वरित पाच पदासाठी पात्र विस्तार अधिकारी नसल्यामुळे त्या जागा रिक्त आहेत.
शिक्षकांना वेध विस्तार अधिकारी पदाचे
जिल्ह्यातील १८ विस्तार अधिकारी पदे वर्ग ३ मधून पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी होण्याचे वेध लागले आहेत. ही प्रक्रिया सध्या जिल्हा परिषदेत सुरु असून लवकरच या प्रक्रियेस अंतिम स्वरुप येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या पुढाकाराने शिक्षण विभागात बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणारी पदोन्नतीची प्रक्रिया गतवर्षी राबवण्यात आली होती. यावर्षीही उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, अधिक्षक हेमंत खाडे, प्रविण सावंत ही प्रक्रिया राबवत आहेत.





